सविस्तर वृत्त: रत्नागिरी शहरातील कोकणनगर भागातील शासकीय रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याबाबत स्थानिक नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होते. ग्राहकांना वेळेवर धान्य न मिळणे, दरमहा अपुरा माल देणे आणि त्याबाबत विचारणा केल्यावर दुकानदाराकडून अरेरावीची भाषा वापरली जाणे, असे प्रकार वारंवार घडत होते. एकाच महिन्याच्या रेशनसाठी नागरिकांना तब्बल ४ ते ५ वेळा दुकानाचे खेटे मारावे लागत होते—कधी फक्त गहू तर कधी केवळ तांदूळ दिले जात असल्याने सर्वसामान्यांचा वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत होता.
या मनमानी कारभाराला कंटाळून कोकणनगरमधील नागरिकांनी एकत्र येत दुकानासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजिया तनवीर मुजावर यांच्याकडे आपल्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या समस्येचे गांभीर्य ओळखून दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुरवठा विभागाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची ठाम मागणी केली.
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी निशा पाइकराव आणि सायली चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोकणनगर येथील रेशन दुकानाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकारी घटनास्थळी पोहोचताच नागरिकांनी आपल्या व्यथा आणि आलेल्या अनुभवांचा पाढा वाचला. पुरवठा अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्राहकांच्या लेखी तक्रारी नोंदवून घेतल्या आणि दुकानातील साठा व नोंदवह्यांची प्राथमिक तपासणी केली.
तपासणीदरम्यान दुकानाच्या कारभारात अत्यंत गंभीर त्रुटी, अनियमतता आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले. यानंतर अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता संबंधित रेशन दुकान सील करण्याची धडक कारवाई केली. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, मनमानी कारभार करणाऱ्या इतर दुकानदारांचेही धाबे दणाणले आहेत.

