HomeRatnagiriभाट्ये किनारपट्टीवर दिव्यांखालीच अंधार! दीड वर्षांपासून पथदीप बंद; गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी

भाट्ये किनारपट्टीवर दिव्यांखालीच अंधार! दीड वर्षांपासून पथदीप बंद; गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भाट्ये रस्त्यावर रात्रीच्या वेळी पसरतोय काळोख; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक व पर्यटक हैराण

रत्नागिरी: रत्नागिरी शहराला लागूनच असलेले आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ‘भाट्ये समुद्रकिनारा’. मात्र, याच भाट्ये गावातील मुख्य रस्त्यावर गेल्या दीड वर्षांपासून रात्रीच्या वेळी भयाण अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर दिमाखात उभे असलेले विजेचे खांब केवळ शोभेच्या वस्तू बनले असून, लाखो रुपयांचा खर्च करूनही नागरिकांच्या पदरी मात्र अंधारच आला आहे.

लाखो रुपयांचा खर्च, तरीही नागरिकांचे हाल

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (विद्युत विभाग) माध्यमातून सुमारे दोन वर्षांपूर्वी भाट्ये बसथांबा ते प्रसिद्ध झरी विनायक मंदिरापर्यंतच्या मार्गावर लाखो रुपये खर्चून पथदीप बसवण्यात आले होते. सुरुवातीचे काही महिने हे दिवे सुरळीत सुरू राहिले; मात्र त्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड होऊन गेल्या दीड वर्षांपासून हे सर्व दिवे पूर्णपणे बंद पडले आहेत.

सुरूच्या बनातून जाताना भीतीचे सावट

भाट्ये सुरूच्या बनातून जाणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडी आहे. रात्रीच्या वेळी पथदीप बंद असल्याने या मार्गावर दाट काळोख पसरतो. अशा अंधारात मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांची टोळकी आणि विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा वावर असतो. त्यामुळे झरी विनायक मंदिराकडे जाणारे भाविक, समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणारे पर्यटक आणि विशेषतः स्थानिक महिला व लहान मुले यांना या मार्गावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

निकृष्ट कामाचा फटका? प्रशासनाचे दुर्लक्ष

ठेकेदाराने पथदीपांसाठी जमिनीखाली टाकलेल्या वीज वाहिन्यांचे (केबल्स) काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. वीज जोडणीतील सदोष तारांमुळेच हे पथदीप बंद पडल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार आणि तक्रारी केल्या, परंतु संबंधित प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

“दोन वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात हे वीज दिवे बसवण्यात आले होते; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते बंद अवस्थेत आहेत. हे दिवे पूर्ववत सुरू व्हावेत यासाठी भाट्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.”

पराग भाटकर (माजी सरपंच, भाट्ये)

गणेशोत्सवापूर्वी दिवे सुरू करण्याची मागणी

आता अवघ्या काही दिवसांवर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजेच ‘गणेशोत्सव’ येऊन ठेपला आहे. या सणाच्या काळात चाकरमानी आणि भाविकांची मोठी वर्दळ या भागात असते, तसेच पावसाळ्यानंतरचा पर्यटन हंगामही सुरू होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी विलंब न लावता तातडीने या समस्येची दखल घ्यावी आणि गणेशोत्सवापूर्वी हे पथदीप दुरुस्त करून हा मार्ग प्रकाशमय करावा, अशी जोरदार मागणी भाट्ये ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular