रत्नागिरी: आपण सर्वजण जेव्हा कुटुंबीयांसोबत दिवाळी, गणेशोत्सव किंवा कोणताही सण आनंदात साजरा करत असतो, तेव्हा खाकी वर्दीतील पोलीस बांधव रस्त्यावर उभे राहून चोवीस तास आपल्या सुरक्षेचा पहारा देत असतात. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक आनंद आणि पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आता रत्नागिरीतून एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आवाज उठला आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत काळानुरूप सुधारणा करण्यात याव्यात आणि अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांना किमान ५ वर्षांतून एकदा तरी आपल्या आवडीच्या सणासाठी अधिकृत सुट्टी मिळावी, अशी आग्रही मागणी रत्नागिरीतील जागरूक नागरिक अमेय प्रदीप परुळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक (DGP) आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांना सविस्तर लेखी निवेदन पाठवले आहे.
कामाच्या स्वरूपानुसार व्हाव्यात स्वतंत्र परीक्षा
सध्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रशासकीय परीक्षांची चौकट सर्व सेवांसाठी जवळपास सारखीच असते. मात्र, पोलीस विभागाचे काम हे थेट गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेशी निगडित असल्याने त्यांच्या निवडीचे निकष वेगळे असावेत, असा मुद्दा या निवेदनात अधोरेखित करण्यात आला आहे.
-
लेखी परीक्षेपूर्वी शारीरिक व मानसिक चाचणी: पोलीस दलात प्रवेश करणाऱ्या उमेदवाराची शारीरिक तंदुरुस्ती (Physical Fitness) आणि मानसिक कणखरता (Mental Health) तपासणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे लेखी परीक्षेच्या आधीच या चाचण्या प्राधान्याने घेतल्या जाव्यात.
-
वास्तविक गुन्ह्यांवर आधारित प्रश्नपत्रिका: केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रत्यक्ष घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आणि तातडीने घ्यावयाचे निर्णय (Decision Making) यावर आधारित प्रश्न लेखी परीक्षेत असावेत, जेणेकरून उमेदवाराच्या कार्यक्षमतेची खरी पारख होईल.
-
प्रयत्नांवर (Attempts) मर्यादा: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकाच संवर्गात प्रयत्न मर्यादित ठेवण्याचा स्पष्ट नियम असावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
‘५ वर्षांतून एकदा २ दिवसांची अधिकृत सुट्टी द्या!’
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि मानसिक तणावाचा विचार करून निवेदनात एक अत्यंत मानवीय मागणी करण्यात आली आहे.
सण-उत्सव, मोर्चे किंवा व्हीआयपी बंदोबस्त यामुळे पोलिसांना सणासुदीच्या काळात स्वतःच्या घरी जाणे शक्य होत नाही. यासाठी शासनाने एक ठोस धोरण ठरवावे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून त्यांच्या आवडीच्या एका सणाबाबत प्रतिज्ञापत्र (Affidavit) भरून घ्यावे आणि दर ५ वर्षांतून किमान एकदा तरी त्या सणासाठी त्यांना २ दिवसांची अधिकृत सुट्टी दिली जावी. तसेच सेवेतून पुढील ५ वर्षांत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या निवृत्तीपूर्वी या योजनेचा लाभ मिळावा, जेणेकरून त्यांना आपल्या परिवारासोबत सणाचा आनंद घेता येईल.
रिक्त पदे त्वरित भरा; परीक्षा पारदर्शक व वेळेत घ्या
पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने सध्या कार्यरत पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी:
-
रिक्त असलेली पदे कालबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने तातडीने भरली जावीत.
-
संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी पोलीस भरतीची परीक्षा घेऊन निकालही वेळेत जाहीर करावेत, जेणेकरून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहील.
खाकी वर्दीमागील माणसाचा विचार करणारी ही मागणी सध्या जनमानसात आणि पोलीस वर्तुळात मोठ्या कौतुकाचा विषय ठरत असून, शासन यावर काय सकारात्मक पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

