एसटी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मोठा दिलासा दिला आहे. एसटी प्रवासातील विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) काढण्यासाठी आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या प्रवाशांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही, ते कार्ड नोंदणीची पावती किंवा जुने स्मार्ट कार्ड दाखवूनही सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेऊ शकणार आहेत.
निर्णय का घेण्यात आला?
एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून प्रवासातील सवलतींसाठी NCMC कार्ड सक्तीचे केले होते. मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि सणासुदीच्या काळात बसस्थानकांवर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती. त्यातच कार्ड नोंदणी केंद्रांवर वारंवार सर्व्हर डाऊन होणे, तांत्रिक अडचणी निर्माण होणे यांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत होते. प्रवाशांची होणारी ही गैरसोय आणि वाढता मनस्ताप लक्षात घेऊन महामंडळाने मुदतवाढ देण्याचा हा व्यवहार्य निर्णय घेतला आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाचे नियम व सवलतीची प्रक्रिया:
-
अर्ज केला असल्यास पावती ग्राह्य: ज्या प्रवाशांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे, पण प्रत्यक्ष कार्ड हातात पडलेले नाही, ते नोंदणीची मूळ पावती दाखवून सवलतीचे तिकीट मिळवू शकतात.
-
स्मार्ट कार्डधारकांना मुभा: ज्यांच्याकडे महामंडळाचे आधीचे स्मार्ट कार्ड वैध स्थितीत उपलब्ध आहे, त्यांना त्या कार्डद्वारेही सवलत सुरू राहील.
-
कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना: बसमधील वाहक (कंडक्टर) व स्थानक कर्मचाऱ्यांना प्रवाशांची ओळखपत्रे व पावती तपासून विनाविलंब सवलतीचे तिकीट देण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात अडीच लाख कार्डचे वितरण
स्मार्ट कार्ड एजंट संदीप चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल २ लाख ५० हजारांहून अधिक कार्डचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी एकट्या रत्नागिरी तालुक्यात सुमारे १ लाख नागरिकांनी कार्ड काढले आहे.
या निर्णयामागील महामंडळाचा मुख्य उद्देश:
बनावट कागदपत्रांच्या आधारे होणारा प्रवास रोखणे, सवलतींचे डिजिटायझेशन करणे आणि ‘कॅशलेस’ डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे हा NCMC कार्ड प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. गेल्या चार महिन्यांत प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन महामंडळाने यापूर्वी ३ ते ४ वेळा मुदतवाढ दिली असून, आता ३० सप्टेंबरपर्यंत ही शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

