कोकणातून मुंबई, पुणे किंवा उत्तर भारताकडे रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर २२ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेतला जात असून, त्याचा थेट परिणाम रत्नागिरीसह संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार आहे.
या आठ दिवसांच्या कालावधीत कोकण मार्गावरील ६ एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांवर मार्गात नियंत्रित (थांबवून ठेवण्यात) केल्या जातील, तर मुंबईहून कोकणात येणाऱ्या २ गाड्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सोडल्या जातील. त्यामुळे मंगळुरू, मडगाव, करमळी आणि एर्नाकुलम या प्रमुख मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा अधिक वेळ प्रवासात घालवावा लागू शकतो.
मार्गात नियंत्रित केल्या जाणाऱ्या ६ गाड्यांचे वेळापत्रक
तांत्रिक कामादरम्यान गाड्यांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालील गाड्या निर्धारित स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येणार आहेत:
-
मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१३४): २२ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ही गाडी आपटा स्थानकावर ५० मिनिटे नियंत्रित केली जाईल.
-
मडगाव-मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस (२०११२): २२ ते २८ नोव्हेंबरदरम्यान सोमटणे स्थानकावर ही गाडी १० मिनिटे थांबवून ठेवली जाईल.
-
तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२११४): २३ नोव्हेंबर रोजी ही गाडी आपटा स्थानकावर १०९ मिनिटे नियंत्रित राहील.
-
एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस (२२१४९): २४ आणि २७ नोव्हेंबर रोजी ही गाडी आपटा येथे १०९ मिनिटे थांबवली जाईल.
-
तिरुअनंतपुरम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२२६५३): २८ नोव्हेंबर रोजी ही गाडी आपटा स्थानकावर १०९ मिनिटे नियंत्रित राहील.
-
एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२२६५५): २५ नोव्हेंबर रोजी ही गाडी ६० मिनिटे नियंत्रित केली जाईल.
कोकणात येणाऱ्या २ गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल
मुंबईतून कोकणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही प्रस्थान वेळेतील हा बदल लक्षात घ्यावा:
-
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस (११०९९): २४, २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी ही गाडी तिच्या मूळ वेळेपेक्षा २ तास उशिराने सुटेल.
-
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२११५): २६ नोव्हेंबर रोजी ही गाडी निर्धारित वेळेपेक्षा २ तास उशिराने रवाना होईल.
प्रवाशांसाठी महत्त्वाचे आवाहन
सदर पॉवर ब्लॉकमुळे प्रवासात होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी गाड्यांची सद्यस्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासावे, तसेच त्यानुसार आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

