क्रुझ ड्रग्ज प्रकरण आर्यन खानवरून बाजूला होऊन नवाब मलिक आणि देवेंद्र फडणविसांमध्ये द्वंद्व सुरु झाले आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक नावे आणि त्यांची प्रकरणे बाहेर आली आहेत. आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन एवढ्या स्वस्तात विकत घेतली असा आरोप केला होता. हे आरोप निरर्थक असून, फडणवीस यांचे अंडरवल्ड जगताशी असलेल्या संबंधांचा स्फोट करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला होता. त्यानंतर मलिक आणि फडणवीस यांनी एकमेकांवर उलटसुलट गंभीर आरोप केले आहेत.
एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या प्रकरणाला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळण देत आहेत. देवेंद्र फडणवीस त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्या अधिकाऱ्याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. २००८ मध्ये आलेला अधिकारी १४ वर्षे मुंबईतच आहे यामागे नक्की काय गौडबंगाल आहे! देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, मग अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या साम्राज्यात सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्षस्थानी कसे काय नेमले? असा खणखणीत सवाल नवाब मलिकांनी केला.
बनावट नोटांचे प्रकरण महसूल गुप्तचर संचालनालयाकडे आहे. जेव्हा बेकायदेशीर १४ कोटी ५६ लाख पकडले गेले तेव्हा आरोपीला त्वरित जामीन कसा काय मिळाला! ज्याला अटक करण्यात आली होती, त्याच्या भावाला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष का बनवण्यात आलेले? याला योगायोग म्हणावा कि, त्यावेळी या प्रकरणाचा तपास अधिकारी समीर वानखेडे होते. हे प्रकरण पुढे महसूल गुप्तचर संचालनालय गेले होते. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयने केली होती.