23 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraएका शिवयुगाचा अस्त, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

एका शिवयुगाचा अस्त, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार घेत असताना, प्रकृतीने साथ न दिल्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज निधन झाले. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरे घरामध्ये पाय घसरून पडल्याने, त्यांना इजा झालेली. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक शिवपर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  जुलै महिन्यातच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी साडे आठ वाजता त्यांचे पार्थिव अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असल्याने प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे दिली. राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या अजरामर महानाट्यचे लेखक, दिग्दर्शक शिवशाहीर, महाराष्ट्र भूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांची आज सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी वयाच्या १०० व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

त्यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे असले तरी, केवळ त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जात असे. सर्व प्रथम ते १९४१ साली भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्त ऐवजांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

महाराष्ट्र सरकारने त्यांना सन २०१५ साली राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरवले. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे बारा हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला असा सगळा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा पदस्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथपर्यंत बाबासाहेब पोहचले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे कि, छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधूनही सापडणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular