HomeRatnagiriआंबा घाट खचल्याने बंद; अणुस्कूरा घाटावर वाहतुकीचा ताण, तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

आंबा घाट खचल्याने बंद; अणुस्कूरा घाटावर वाहतुकीचा ताण, तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी

ओझरे खिंडीजवळ रस्ता खचल्याने अवजड वाहतूक बंद; ओणी-अणुस्कूरा-रायपाटन मार्गाची खड्ड्यांमुळे दुर्दशा.

रत्नागिरी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आंबा घाट मुसळधार पावसामुळे खचल्याने या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंबा घाटातील वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर आता संपूर्ण वाहतुकीचा भार पर्यायी मार्ग असलेल्या अणुस्कूरा घाटावर येऊन पडला आहे. मात्र, ओणी-अणुस्कूरा-रायपाटन रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

ओझरे खिंडीजवळ रस्ता खचला, ३० मीटर भिंत दरीत कोसळली

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात ओझरे खिंडीजवळ रस्त्याला मोठी भेग पडली आहे. इतकेच नाही तर रस्त्याची सुमारे ३० मीटर लांबीची संरक्षक भिंत तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका

रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र ही मुख्य बाजारपेठ मानली जाते. दररोज याच मार्गाने किराणा माल, कडधान्ये, भाजीपाला, दूध, बांधकाम साहित्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची मोठी वाहतूक होत असते. आंबा घाट अचानक बंद झाल्याने कोल्हापूरकडून येणारी सर्व अवजड वाहने अणुस्कूरा घाटाकडे वळवण्यात आली आहेत. यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत होण्याची आणि वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अणुस्कूरा मार्गाची चाळण; जुन्या अनुभवाची पुनरावृत्ती?

ज्या अणुस्कूरा-रायपाटन-ओणी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे, तो रस्ता आधीच खड्ड्यांमुळे चाळण झाला आहे. अचानक वाढलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. खोल खड्ड्यांमुळे चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

यापूर्वी २०२१ मध्येही जेव्हा आंबा घाट खचला होता, तेव्हा अणुस्कूरा मार्गाची मोठी दुरवस्था झाली होती. त्या जुन्या कटू अनुभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने युद्धपातळीवर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी आता नागरिक आणि व्यापारी करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular