संगमेश्वर / आरवली: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना निसर्गरम्य कोकण जितकं सुखावणारं वाटतं, तितकेच महामार्गावरील अपघात काळजाचा ठोका चुकवणारे ठरतात. असाच एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडाजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. एक भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विरुद्ध दिशेला गेला आणि रस्त्याच्या कडेला उलटला. अपघात इतका भीषण होता की, तिथे उपस्थित लोकांचा थरकाप उडाला. मात्र, म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’.. या संपूर्ण घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठी जीवितहानी टळली.
अचानक काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार!
नेहमीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरू होती. आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळही स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची ये-जा सुरू होती. तितक्यात, एका भरधाव ट्रकने आपली लेन सोडली. चालकाचा ट्रकवरील ताबा पूर्णपणे सुटला होता. तो अवाढव्य ट्रक थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला. समोरून येणाऱ्या वाहनांना वाचवण्याच्या प्रयत्नात म्हणा किंवा वेगामुळे, ट्रक महामार्गाच्या कडेला जाऊन कलंडला. हा अपघात एवढ्या वेगाने आणि मोठ्या आवाजासह झाला की, आजूबाजूच्या परिसरात काही काळ प्रचंड भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
चालक दारूच्या नशेत धुंद; स्थानिकांचा संताप
अपघाताचा भीषण आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी कसलाही विचार न करता मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रसंगावधान राखून त्यांनी ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. चालक सुरक्षित तर होता, पण त्याला बाहेर काढताच ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो ट्रक चालक पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद (मद्यधुंद) होता. त्याला स्वतःवर आणि वाहनावर ताबा ठेवता येत नव्हता. महामार्गासारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे नशेत गाडी चालवून या चालकाने स्वतःच्या आणि निष्पाप प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडला होता. जर वेळीच समोरची वाहने बाजूला झाली नसती, तर खूप मोठा जीवघेणा अनर्थ ओढवला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
पोलिसांकडून कारवाई होणार का? सुजाण नागरिकांचा सवाल
विशेष म्हणजे, एवढा मोठा अपघात होऊनही या घटनेची स्थानिक पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृतपणे कोणतीही नोंद झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे कोकणातील सुजाण नागरिक आणि महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “अशा बेजबाबदार आणि मद्यधुंद चालकांमुळे निरपराध लोकांचे बळी जातात. पोलिसांनी अपघाताची वाट न पाहता स्वतःहून (Sua Moto) अशा बेदरकार चालकांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे,” अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

