सावंतवाडीतील तरुणाला पडलेल्या स्वप्नामुळे खेड भोस्ते घाटातील मृतदेहाचा उलगडा झाला. परंतु या स्वप्नाबद्धल सांगणारा योगेश पिंपळ आर्या (वय ३०, रा. सावंतवाडी आजगांव) हाच चार दिवस झाले गायब झाला आहे. आर्या बेपत्ता झाल्याची तक्रार नाटे पोलिस ठाण्यात वडिलांनी दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या गूढ मृत्यूच्या तपासाला पुन्हा खीळ बसली आहे. आर्याच्या या स्वप्नामुळे आणि प्रत्यक्ष भोस्ते घाटातील जंगलात आढळलेल्या मृतदेहामुळे पोलिस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. गोवा, खेड, सिंधुदुर्ग, सुरत, रायगड आदी ठिकाणी पोलिस तपासाला जाऊन आले. तेथुन बेपत्ता झालेल्यांची माहिती घेत आहेत.
आर्या पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारे माहिती देऊन दिशाहिन करण्याचा प्रयत्न करत आहे. तो सांगेल त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. परंतु त्यातून काहीच साध्य होताना दिसत नाही. स्वप्नाचा हा प्रकार सर्वांनाच अचंबित करणारा आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरुणाने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये प्रचंड तफावत असल्याने हा सर्व बनाव असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे मृताची ओळख पटण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. संबंधित तरुणाची मानसोपचारतज्ज्ञाद्वारे तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तपासात गरज भसल्यास साक्षीदार असलेल्या योगेश आर्याला नाटे येथे त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले होते. तेथून त्याला आवश्यकतेप्रमाणे तपासासाठी बोलावण्यात येत होते. परंतु आता चार दिवस झाले आर्या गायब आहे. त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्या या स्वप्नावर कोणी विश्वास ठेवत नाही. परंतु यातील सत्य मी उघड करणार त्यासाठी मी बाहेर पडल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितल. त्याच्याकडे मोबाईल नसल्याने आर्याच्या शोधात पोलिस आहेत. आर्याच गायब झाल्याने या गूढ मृत्यूचा तपास थांबला आहे.