वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मुंबई गोवा महामार्ग धोकादायक झाल्यामुळे दहा टप्प्यात चौपदरीकरण सुरू झाले आहे. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले तर रत्नागिरी जिल्ह्यातील ३० टक्के काम अपूर्ण आहे. कोकणातील हा महामार्ग रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षराजी आणि झाडांमुळे पर्यटनासाठीच प्रसिद्ध होता. सावलीतून प्रवास करणे प्रवाशांना आल्हाददायक वाटत होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याजवळील आणि चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्याचा फटका महामागनि प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांना बसत आहे. दुतर्फा झाडी नसल्यामुळे या महामार्गावर दुपारी प्रवास करणे अडचणीचे ठरत आहेत. गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका वाढल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एसटीसाठी उन्हात उभे राहून प्रवाशांना प्रतीक्षा करत असतात. याकडे ना महामार्ग विभागाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे…
जिल्ह्यात १४ टक्के वृक्षलागवड – मुंबई-गोवा महामार्गाचे काम रडतखडत सुरू आहे. हे काम धीम्या गतीने सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीची गतीही कूर्मगतीने सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाचे केलेल्या चौपदरीकरणात रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा अशी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यात परशुराम ते आरवली, आरवली ते कांटे, कांटे ते वाकेड आणि वाकेड ते तळगाव अशा टप्प्यामध्ये सावर्जनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी लागवड केली आहे. त्यामध्ये दुतर्फा ८८ हजार ८१ आणि मध्यभागी ११ हजार ३५२ असे ९९ हजार ४३३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यापैकी दुतर्फा ४ हजार २२४ आणि मध्यभागी ४ हजार ९६७अशी एकूण ९ हजार १९१ वृक्षलागवड झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ९९ हजार ४३३ रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी केवळ ९ हजार १९१ रोपांची लागवड झाली आहे. सरासरी १४.२ टक्के कार्यवाही झालेली आहे.
महामार्गावर सावलीचा अभाव – गेल्या काही दिवसांत तापमान वाढले असून, रत्नागिरी जिल्ह्यात तापमान ३६-३७ अंश राहिले आहे. महामार्गावर झाडांची सावली नसल्यामुळे रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत वाहनचालकांसह प्रवाशांना मार्गस्थ व्हावे लागते. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सावलीत विश्रांती घेण्यासाठी दुचाकीचालकांना थांबताही येत नाही. रणरणत्या उन्हाच्या चटक्यांमुळे त्रस्त प्रवासी कोणी सावली देता का सावली? असे म्हणत आहेत.
पाण्याअभावी झाडे गेली सुकून – महामार्गावर आरवली ते कांटे आणि वाकेट ते तळगाव या भागात दुभाजकांमध्ये झाडांची लागवड केलेली नाही. जिथे झाडे लावली आहेत, त्यांना दररोज किंवा एक दिवसाआड पाणी दिले जात होते. त्यामुळे रखरखत्या भरउन्हात ही झाडे टिकून जिवंत होती. सध्या या झाडांना पुरेसे पाणी दिले जात नसल्यामुळे ती सुकून गेली आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने ही झाडे लावण्यात आली तो उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे झाडे लागवडीचा फार्सच ठरला आहे.