तालुक्यातील नाटे येथील घेरायशवंतगड किल्ल्याच्या जतन-संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. पुरातत्त्व विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून हे काम हाती घेतले असून, सुशोभीकरणानंतर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले यशवंतगडाचे जतन आणि संवर्धन होताना किल्ल्याला नवा साज चढणार आहे. तालुक्यातील अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर जैतापूर खाडीच्या काठावर किल्ले यशवंतगड आहे. सुमारे सात एकर (२.८४ हेक्टर) क्षेत्रफळामध्ये वसलेला हा किल्ला नाटे गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असून, तो दोन भागामध्ये विभागलेला आहे. संपूर्ण किल्ला जांभा घडीव दगडांच्या चिऱ्यांमध्ये बांधलेला असून जैतापूर खाडीच्या काठावरील डोंगरउतारावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या भक्कम तटबंदीस चहूबाजूंनी एकूण सतरा बुरूज असून बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वारही दोन भक्कम बुरूजांमध्ये लपलेले आहे.
गोड्या पाण्याची विहीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली होती. त्यामुळे किल्ला झाड, वेलींनी झाकून गेला होता. या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे, या हेतूने शिवसंघर्ष संघटना, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटना व दुर्गप्रेमी मागील काही वर्षांपासून दरवर्षी गडाचा थोड्या थोड्या भागातील झाडी तोडून गड मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून, किल्ल्याची ढासळलेली तटबंदी, बुरुजांची डागडुजी करण्यात येत असून, मुख्य दरवाजापासून आतील परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे.
२८ तोफांचा उल्लेख – प्राचीन जैतापूर व मुसाकाजी बंदरावर आणि राजापूर तथा जैतापूर खाडीतून होणाऱ्या व्यापारी मालवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आल्याचे जाणकार सांगतात. या किल्ल्याविषयी फारसा इतिहास ज्ञात नसला तरी या किल्ल्याची बांधणी १६व्या शतकात आदिलशाहीत झाली असून, खरा अंमल मात्र नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्यानंतर मराठ्यांचा राहिला. १८६२ च्या पाहणीत त्यावर २८ तोफा आढळल्याचाही उल्लेख आढळतो.