कोयना धरणातून बाहेर पडणाऱ्या ६८ टीएमसी पाण्यापैकी १८ टीएमसी पाणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात येणार आहे. ज्या प्रदेशातून नदी वाहते तेथील जनतेचा त्या पाण्यावर समान हक्क ‘रिपेरियन राइट’ प्राधान्याने मान्य केला पाहिजे. त्यानुसारच वाशिष्ठी नदीतील पाण्याचा वापर कोकणवासीयांसाठी झाला तर ६५ हजार हेक्टर जमीन कायमची सिंचनाखाली येऊ शकते, असे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले. कोयना धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या नियोजनाविषयी राज्य शासनाकडून पाऊल उचलले जात आहे. या विषयी अॅड. पाटणे म्हणाले, वाशिष्ठी, सावित्री, शास्त्री आदी कोकणातील नद्यांचा उगम सह्याद्रीच्या खोऱ्यात होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांमधील पाण्याची एकूण क्षमता ६१२ टीएमसी म्हणजे ९८ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणापेक्षा सहापट आहे; परंतु, हे सारे पाणी समुद्रात वाहून जाते. छोट्या धरणांची साखळी निर्माण करून ते वीजनिर्मितीसाठी आणि सिंचनासाठी वापरण्याची सूचना स्वामीनाथन् समितीने केली होती.
निसर्गाचा असमतोल, पर्यावरणामध्ये बिघाड, प्रचंड वृक्षतोड या सर्व घटकांचा परिणाम पर्जन्यमानाच्या विस्कळीतपणावर होतो. गेली अनेक वर्षे बेछूट वेगाने भूजलाचा प्रचंड उपसा होत आहे. पंडित नेहरू यांनी १९५२ मध्ये कोयना धरणाचा प्रस्ताव मांडला तेव्हा वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडणाऱ्या पाण्याचा काय उपयोग करणार, असा मूलगामी प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर अद्यापी कोकणी. माणसाला सापडलेले नाही. कोयना धरणाचे काम पूर्ण होऊन ५० वर्षे होत आली आहेत तसेच, हेळवाक येथून वाशिष्ठी नदीत वाहून जाणारे १९०० दशलक्ष घनमीटरइतके आहे. सर्व कोयनेचे पाणी वाशिष्ठीमार्गे दाभोळ येथे समुद्राला मिळते. वाशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवण्याकरिता गंभीरपणे विचार केला पाहिजे. या पाण्यावर ६५ हजार हेक्टर जमीन कायमची सिंचनाखाली येऊ शकते.
वाशिष्ठीचे पाणी उचलून पुरवणे सहज शक्य – रत्नागिरीतील दापोली गाव साधारणः ८०० फूट उंचीवर आहे. यास्तव रत्नागिरी जिल्ह्यात सर्वसाधारणपणे १२०० फूट उंचावर वाशिष्ठीचे पाणी उचलून पुरवणे सहज शक्य आहे. कोकणात आंब्याप्रमाणे विविध फळबागा विकसित करणे योग्य होईल. समुद्रापासून दूर मत्स्यपालन तसेच खेकडा संवर्धनासाठी या पाण्याचा उपयोग करता येईल तसेच, कोकणातील पडिक जमिनीवर दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेऊन मराठवाड्यातील जनावरांना चारा देता येईल. कोकणातील खेड्यातील वाडीवस्तीवरील गरीब जनतेच्या पिण्याचे पाणी, शेती, पर्यटन, उद्योग यांची गरज भागवून मराठवाड्याला प्यायला पाणी देणे न्यायाचे होईल, असे पाटणे यांनी सांगितले.