तालुक्यातील २१४ गावांतील ११२ ग्रामपंचायतीचा कारभार अवघ्या ६७ ग्रामसेवकांच्या हाती आहे. तालुक्यातील ३५ पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत ग्रामसेवकांवर अतिरिक्त ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या गावांमधील अतिरिक्त काम करताना ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबरोबरच त्या-त्या गावातील ग्रामस्थांनाही अनेकवेळा ग्रामसेवकांची प्रतीक्षा करत राहावे लागते. तालुक्यातील ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची १५ पदे मंजूर असतानाही अवघे १३ ग्रामविस्तार अधिकारी कार्यरत आहेत. २ ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
तसेच ग्रामसेवकांच्या ८७ मंजूर पदांपैकी ३३ ग्रामसेवकांची पदे अद्याप रिक्त आहेत. कार्यरत ग्रामसेवकांवर अन्य २ ते ३ ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपवलेला आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळताना ग्रामसेवकांवर ताण पडत आहे. ग्रामसेवकांची ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नाही. त्या-त्या गावातील ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामसेवक नेमके कधी उपलब्ध होतील याचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे ग्रामस्थांना तासनतास ग्रामपंचायत कार्यालयात तिष्ठत बसावे लागते.
तालुक्यातील ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक अतिरिक्त ग्रामपंचायतींचाही नेटाने कारभार करत ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. तरीही ग्रामसेवकांच्या रिक्त जागांबाबतचा अहवाल वरिष्ठ पातळीवर रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचालीच होत नाही. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. याची प्रशासनाने गांभीर दखल घेऊन ग्रामसेवकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.