खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरालगत असलेल्या एका पॉश आणि उच्चभ्रू वस्तीत चोरीच्या एकापाठोपाठ एका घटनांनी खळबळ उडाली आहे. वेरळ येथील ‘श्री समर्थ कृपा विश्व रो-हाउसेस’ या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या २४ तासांच्या आत तब्बल चार आलिशान बंगल्यांचे टाळे तोडून चोरट्यांनी लाखाqचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या थरारक प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
उच्चभ्रू वस्तीत राहतात प्रतिष्ठित नागरिक वेरळ येथील ही रो-हाउसेस सोसायटी अतिशय सुरक्षित आणि शांत परिसर म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, या हायफाय सोसायटीत न्यायाधीश, नामांकित वकील, मोठे उद्योजक आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने कुटुंबासह वास्तव्यास आहेत. असे असतानाही चोरट्यांनी थेट याच पॉश परिसराला टार्गेट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नियोजनाबद्ध कट आणि सलग चोऱ्या मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या सोसायटीतील सलग तीन बंगल्यांचे कुलूपे किंवा दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंसह इतर ऐवज लांबवला. या घटनेचा पोलीस तपास सुरू असतानाच, सोमवारी पहाटे याच परिसरातील आणखी एका बंगल्यात घरफोडी झाल्याचे उघड झाले. अत्यंत नियोजनपूर्वक रेकी करूनच या चोरट्यांनी या चोऱ्या केल्या असाव्यात, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह एकापाठोपाठ एक अशा चार मोठ्या बंगल्यांमध्ये चोरी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीत जर अशी सुरक्षिततेची स्थिती असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आता विचारला जात आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त पुरेशा प्रमाणात होत आहे का, असा प्रश्नही या निमित्ताने एरणीवर आला आहे.
नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता चारही बंगल्यांमध्ये नेमका किती लाखांचा मुद्देमाल लंपास झाला आहे, याचा अधिकृत आणि अंतिम तपशील अद्याप समोर आलेला नाही. बाधित घरमालकांकडून चोरीला गेलेल्या सोन्या-नाण्यांची आणि रोकडची मोजणी व यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेनंतरच चोरीची नेमकी व्याप्ती स्पष्ट होईल.
नागरिकांची कडक कारवाईची मागणी या सराईत चोरांना जेरबंद करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, रात्रीची गस्त वाढवावी आणि संशयितांचा कसून शोध घ्यावा, अशी आग्रही मागणी खेड तालुक्यातील संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

