सख्खा भाऊ पक्का वैरी ठरल्याची दुर्देवी घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. सागाच्या झाडांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वाटपाच्या वादावरून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा जीव घेतल्याची संतापजनक घटना राजापूर तालुक्यातील कणेरी खालचीवाडी येथे घडल्याचे उघड झाले आहे. सुमारे ७ महिन्यापूर्वी घडलेल्या या गुप्त खूनाच्या घटनेबाबत एक निमावी पत्र व त्यानंतर मुलीने केलेल्या तक्रारीवरून हा खून झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी राजापूर पोलीसांनी प्रविण गोविंद लाखण (४८) रा. कणेरी खालचीवाडी याला अटक केली आहे. त्याला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली.
प्रविण गोविंद लाखण रा. कणेरी खालचीवाडी याने आपला सख्खा भाऊ दशरथ गोविंद लाखण (४९) यांचा खून केल्याची तक्रार दशरथ यांची मुलगी वेदा विजय कोळेकर रा. हातिवले हिने राजापूर पोलीसांत केली आहे. २१ मे २०२३ रोजी हा प्रकार घडला होता. या खून प्रकरणात प्रारंभी आलेले एक निनावी पत्र व त्यानंतर मुलीला धीर दिल्यानंतर तिच्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी शिताफीने या प्रकरणी कारवाई करत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेत मृत्यू पावलेले दशरथ लाखण हे संशयित आरोपी प्रविण लाखण व त्यांची आई असे तिघेजण कणेरी खालचीवाडी गावात एकत्र राहत होते. सामाईक मालकीच्या सागाच्या झाडांची विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले पैसे वाटून घेण्याबाबत या दोघांमध्ये वाद होता.
मिळालेले पैसे सर्वांनी वाटून घेऊया, असा दशरथ यांचा आग्रह होता. यावरून वाद विकोपाला गेला. आरोपी प्रविण याने भाऊ दशरथ याला २१ मे रोजी दुपारी साडेतीनच्या पूर्वी काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या तोंडावर, डोक्यावर व डोळयावर गंभीर दुखापत झाली होती. यात दशरथ याचा २४ मे रोजी दुपारी १.३० वा. वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर तातडीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावेही नष्ट करण्यात आले होते. असेही वेदा हिने तक्रारीत नमूद केले आहे. आपल्या वडिलांचा अचानक अशाप्रकारे मृत्यू झाल्याने मुलगी वेदा हिला संशय येत होता. मात्र अशा प्रकारे काही तक्रार केल्यास तुलाही जीवे मारू अशी धमकी प्रविण याने आपणाला दिली होती, असे वेदा हिने तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेनंतर प्रविण हा एकटाच गावातील घरी राहत होता. तर आईही दुसरा मुलगा संतोष याच्याकडे मुंबईत रहात आहे, तशी माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान या खूनाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे एक निनावी पत्र देखील आले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काडगे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंडगे व राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व सहकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली व दशरथ यांची मुलगी वेदा हिला धीर देत वस्तुस्थिती कथन करण्यास सांगितले. त्यानंतर वेदा हिने शुक्रवारी या प्रकरणी राजापूर पोलीसात आपली तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी प्रविण लाखण यांच्याविरोधात भा.द.वि. कलम ३०२, २०१ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री १० वाजता कणेरी येथील रहात्या घरातून अटक केली आहे. त्याला शनिवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावेली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व सहका-यांनी ही तातडीने या प्रकरणी कारवाई केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत.