ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर सॅटेलाईट टॅगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले कासव मादीने गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर १२० अंडी घातली होती. या अंड्यापैकी १०७ कासवांच्या पिल्लांचा समुद्रीप्रवास सुरू झाला आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील कासवे स्थलांतर करतात, हे संशोधनाने सिद्ध केले आहे. त्याचा संदर्भ किनाऱ्यालगतचे तापमान, आर्द्रता आणि अन्नाची उपलब्धता आदी बार्बीशी असू शकतो, असे मत कासवाच्या जीवनाचा अभ्यास करणाऱ्या निधी म्हात्रे यांनी म्हटले आहे. यावर्षी ओडिशामधील कासवाने तब्बल ३५०० कि.मी.चा प्रवास करत गुहागरचा समुद्रकिनारा गाठला.
२७ जानेवारी २०२५ ला गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सॅटेलाईट टॅगिंग (टॅग क्र. ०३२३३) केलेली मादी ऑलिव्ह रिडले अंडी देण्यासाठी आली होती. गस्तीवर असणाऱ्या कासव मित्रांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या मादीने घातलेली अंडी संवर्धित करताना तशी नोंद करून ठेवली. तसेच ही गोष्ट अधिकाऱ्यांना सांगितली. त्यातूनच शास्त्रज्ञ डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी या मादी कासवाला १८ मार्च २०२१ मध्ये ओडिशामधील गहिरमाथा किनाऱ्यावर टॅग केल्याची माहिती मिळाली. या मादीने दिलेल्या १२० अंड्यांमधील १०७ अंड्यांमधून पिल्ले जन्माला आली. या पिल्लांना गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरून समुद्रात सोडले.
‘बागेश्री’ने गाठली भारताची किनारपट्टी – या घटनेमुळे पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील कासवे हजारो कि.मी.चा प्रवास करतात, हे सिद्ध झाले आहे. गुहागरमध्ये अशाचप्रमाणे डॉ. सुरेशकुमार यांनी ५ कासवांना सॅटेलाईट टॅगिंग केले होते. त्यातील बागेश्री या मादी कासवाने अवघ्या सहा महिन्यांत श्रीलंकेला ओलांडून भारताची पूर्व किनारपट्टी गाठली होती.