कोकण रेल्वे मार्गावर खेड-दिवाण खवटीनजीक ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. ही घटना मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवल्या होत्या. ओव्हरहेड वायर तुटण्याचा आठवड्यातील हा दुसरा प्रकार आहे. कोकण रेल्वे मार्गावर आज सायंकाळच्या सुमारास नेत्रावती एक्स्प्रेस पुढे निघून गेल्यानंतर काही वेळाने दिवाणखवटीच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. हा प्रकार घडल्यानंतर या टप्प्यातील वाहतूक थांबविली. सुदैवाने या कालावधीत आजूबाजूच्या स्थानकावर रेल्वेगाड्या आलेल्या नव्हत्या. मत्स्यगंधा एक्स्प्रेस रोहा स्थानकात, तर मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवून ठेवली होती.
या प्रकाराची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम सुरू करण्यात आले. संध्याकाळी साडेसातपर्यंत तुटलेली ओव्हरहेड वायर जोडली. सुरक्षेविषयीचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ झाल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही तासांसाठी विस्कळीत झाले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वंदेभारत एक्स्प्रेस दिवाणखवटी येथून रवाना झाली.
टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू – वेरावल एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे आणि पूर्णा एक्स्प्रेस ५ तास उशिराने धावत होती. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडू नये यासाठी सर्व गाड्या खेड स्थानकाच्या जवळपास असलेल्या अंजनी, चिपळूण, सावर्डे येथपर्यंत आणून ठेवण्यात येत होत्या. मात्र, या मार्गावरील सर्व गाड्यांचा वेग मंदावलेला होता, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.