तुटपुंज्या मानधनामध्ये समाधान मानीत काम करतो, ते मानधनही तीन-तीन महिने मिळत नसेल, तर कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा कसा, अशा शब्दामध्ये संताप व्यक्त करीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी मानधन तत्त्वावर नेमणुका केलेल्या शिक्षकांसमवेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला टाळे ठोकले. जोपर्यंत बँक खात्यामध्ये मानधन जमा होत नाही, तोपर्यंत कार्यालयाला ठोकलेले टाळे काढणार नाही, असा इशारा दिला. श्री. नागले यांनी मानधन तत्त्वावरील शिक्षकांसमवेत प्रभारी गटविकास अधिकारी परेश सुर्वे, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याशी रखडलेल्या मानधनाविषयी सविस्तर चर्चा केली. मानधन का रखडले असा सवाल नागले आणि शिक्षकांनी उपस्थित केला.
गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले यांनी शिक्षकांच्या मानधनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून शिक्षक भरती झालेली नाही. त्याचवेळी वयोमानानुसार गेल्या काही वर्षामध्ये मोठ्यासंख्येने शिक्षक निवृत्त झाले आहेत. काहींनी जिल्हा बदली करून घेतली आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेने मानधन तत्त्वावर शिक्षकांची भरती केली, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या शिक्षकांना मानधनच मिळालेले नाही. प्रलंबित मानधनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी श्री. नागले यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी पंचायत समितीवर धडक दिली आणि शिक्षण विभागाला टाळे ठोकले. या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी नाना कोरगावकर, मनोज आडविलकर, प्रशांत गावकर, कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आदी उपस्थित होते.