नगर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीला नगरपालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, पोलिस निरीक्षक अमित यादव, राजापूर तालुका व्यापारीसंघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष दीनानाथ कोळवणकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय पवार, इंदुलकर, राजापूर अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष विवेक गादीकर, नगरपालिकेच्या यांत्रिकी आणि पर्यावरण विभागाच्या कनिष्ठ अभियंता सुप्रिया पोतदार, आरोग्य निरीक्षक अमित यादव आदी उपस्थित होते. राजापूर शहरामध्ये दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार दिवसेंदिवस अस्ताव्यस्त होत चालला आहे. आठवडा बाजारामध्ये मोकळी जागा मिळेल तिथे बेशिस्तपणे दुकाने थाटली जात असून, त्यामध्ये नगरपालिकेने आठवडा बाजारामध्ये दुकाने मांडण्यासाठी केलेली जागा निश्चिती आणि नियमावली व्यापाऱ्यांकडून धाब्यावर बसवली जात आहे.
या साऱ्यातून आठवडा बाजाराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे दैनिक ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. आठवडा बाजार आणि वाहतूक कोंडीप्रकरणी झालेल्या बैठकीमध्ये आठवडा बाजारातील बेशिस्तीसह मालाचा दर्जा आणि वजनकाट्यांतील तफावत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पूर्वीप्रमाणे एकाच प्रकारची दुकाने एकाच भागामध्ये भरण्यात यावीत, नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था व्हावी, मालांचा दर्जा आणि वजनकाट्यांची तपासणी व्हावी, व्यापाऱ्यांची सविस्तर माहिती नोंदवावीत अशा विविध सूचना मांडण्यात आल्या. त्याप्रमाणे पालिकेने योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
नो व्यापारी झोन – आठवडा बाजार भरत असलेल्या बंदरधक्का येथील रस्त्याच्या नजीकच्या पिंपळपाराच्या परिसरातील कमी रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकाने थाटलेली असतात. त्यामुळे बहुतांशवेळा या भागामध्ये आठवडा बाजारादिवशी सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे या भागामध्ये व्यापाऱ्यांना दुकाने थाटण्यास मज्जाव करावा आणि या भागामध्ये नो व्यापारी झोन तयार करावा, अशी सूचना पालिकेला करण्यात आली. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.