HomeRatnagiriरत्नागिरीत १ टक्का व्याजाने १ कोटी कर्जाचे आमिष; ४५ नागरिकांची लाखोंची फसवणूक,...

रत्नागिरीत १ टक्का व्याजाने १ कोटी कर्जाचे आमिष; ४५ नागरिकांची लाखोंची फसवणूक, पोलिसांत धाव

१५ कोटींची रोकड दाखवून जाळ्यात ओढले; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी, मध्यरात्री संशयास्पद हालचाली

रत्नागिरी: “अवघे १ लाख रुपये भरा आणि केवळ १ टक्का इतक्या नाममात्र व्याजदरावर तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज मिळवा…” अशा स्वप्नवत आमिषाला भुलून रत्नागिरीतील अनेक सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. एका मोठ्या आर्थिक रॅकेटने शहरात पद्धतशीरपणे जाळे विणून सुमारे ४० ते ४५ नागरिकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही नागरिकांना तर चक्क ४ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचे मोठे आश्वासन देण्यात आले होते. आता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्रस्त नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

१ लाख उकळले, महिनाभर केवळ आश्वासनेच

फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कर्ज मंजुरीच्या बहाण्याने एका महिलेने तक्रारदारांकडून प्रत्येकी १ लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले. पैसे दिल्यानंतर महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष कर्जाचा एक रुपयाही खात्यावर जमा झाला नाही. नागरिकांनी जेव्हा जेव्हा याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे’ अशी बतावणी करत रोज नव्या तारखा देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. सततच्या चालढकलमुळे अखेर नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

डोळे दिपवणारी १५ कोटींची रोकड आणि मध्यरात्रीचा संशयास्पद व्यवहार

या संपूर्ण फसवणुकीच्या कटात नागरिकांचा पूर्ण विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी एक शक्कल लढवली होती. तक्रारदारांना तब्बल १५ कोटी रुपयांची रोकड दाखवण्यात आली होती. ही रक्कम अधिकृत ‘बँक मनी’ असून ती खास गुहागर येथून आणल्याचा दावा संशयितांनी केला होता.

एवढेच नाही तर, सुमारे चार दिवसांपूर्वी गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद रित्या पैसे वाटपाचा एक गोपनीय कार्यक्रम पार पडल्याचा खळबळजनक आरोपही तक्रारदारांनी केला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये अनेक व्यक्तींच्या खात्यांवर लाखो रुपयांची ऑनलाईन देवाणघेवाण झाल्याचे ठोस पुरावे आणि बँक स्टेटमेंट्स नागरिकांनी तक्रार अर्जासोबत पोलिसांकडे सादर केले आहेत.

पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी आणि रिक्षेतून रोकड वाहतूक

आपली घोर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जेव्हा पीडित नागरिकांनी संबंधित महिलेकडे स्वतःचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या महिलेचे खरे रूप समोर आले. पैसे परत देण्याऐवजी नागरिकांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. “पोलिसांत तक्रार केली किंवा १५ कोटींच्या व्यवहाराविषयी तोंड उघडले, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा दम भरण्यात आला. तसेच नागरिकांच्या नावावर बनावट कागदपत्रे व खोटे धनादेश (चेक) तयार करून त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली.

या काळ्या धंद्यात एका रिक्षाचा सातत्याने वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदारांच्या मते, याच रिक्षेतून लाखो-कोटींच्या रोकडची ने-आण केली जात होती. त्यामुळे या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक आणि मालकाचा तात्काळ शोध घेऊन कसून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मोठ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? पोलिसांच्या तपासाकडे लक्ष

अवघ्या एका लाखाच्या मोबदल्यात १ टक्का व्याजदराने कोट्यवधींचे कर्ज देणारी ही कोणती समांतर आर्थिक यंत्रणा रत्नागिरीत सक्रिय आहे? नागरिकांना दाखवण्यात आलेले ते १५ कोटी रुपये नेमके कोणाचे होते? आणि यामागे शहरातील अथवा बाहेरील कोणती मोठी गुन्हेगारी टोळी कार्यरत आहे? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या फसवणुकीत अनेक महिला व सामान्य नागरिक भरडले गेले असल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहर पोलिसांत रीतसर तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर आता पोलीस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून मुख्य सूत्रधाराला कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular