रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम’ (Ratnagiri Anti Drug Campaign) राबवत जिल्हा पोलीस दलाने केवळ २० दिवसांत तब्बल २५ गुन्हे दाखल केले असून ३५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या (NCORD) जिल्हास्तरीय समितीची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या मोहिमेचा सविस्तर ताळेबंद मांडला.
ब्राऊन शुगर, गांजा जप्त; मासेमारी बोटींवर करडी नजर
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत २२ ग्रॅम घातक ब्राऊन शुगर (हिरॉईन) आणि २ हजार ७८५ किलो गांजा हस्तगत केला आहे. गेल्या वर्षभरातील कारवाईचा विचार केल्यास, १२४ गुन्ह्यांची नोंद करत ६० वेगवेगळ्या कारवायांमध्ये ८६ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बैठकीत एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. जिल्ह्यातील काही भागांत, विशेषतः नेपाळी कामगारांमध्ये गांजा आणि ब्राऊन शुगरच्या सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. तसेच सागरी सीमेवरून होणारी संभाव्य तस्करी रोखण्यासाठी मासेमारी बोटींची कसून व सखोल तपासणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ कारवाईवर न थांबता ग्रामीण भागात ‘सेवा संकल्प’ अभियान व ग्रामसभांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची जनजागृतीही जोमाने सुरू आहे.
कारखान्यांवर अचानक धाडी घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्ह्यातील अमली पदार्थांचे नेटवर्क मुळापासून उखडून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सर्व विभागांना ‘ॲक्शन मोड’मध्ये काम करण्याचे निर्देश दिले.
-
औद्योगिक तपासणी: एमआयडीसी (MIDC), पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) या यंत्रणांनी संयुक्त पथक तयार करून जिल्ह्यातील रासायनिक व इतर कारखान्यांची अचानक (Surprise Inspection) तपासणी करावी.
-
बोटींची नोंदणी: मत्स्यव्यवसाय विभागाने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व मासेमारी बोटींची नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
-
२०२९ चे उद्दिष्ट व शाळांमध्ये प्रबोधन: केंद्र व राज्य शासनाचे या मोहिमेवर थेट लक्ष असून वर्ष २०२९ पर्यंत देशाला ‘नशामुक्त’ करण्याचे ध्येय आहे. यासाठी शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रबोधन मोहिमा राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
प्रांताधिकारी जीवन देसाईंचा दणका: ६ तस्कर एकाच दिवशी हद्दपार!
केवळ पोलीस कारवाईपुरते मर्यादित न राहता महसूल व दंडाधिकारी पातळीवरही तस्करांवर कडक कायदेशीर आसूड ओढला जात आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्यान्वये कठोर पाऊल उचलत एकाच दिवशी ६ समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
हद्दपार करण्यात आलेले आरोपी:
-
सचिन राजाराम म्हापूसकर
-
अरमान लियाकत धामस्कर
-
नजब असीफ मिरजकर
-
मस्तान मकदूम शेख
-
फुरकान यासिन फणसोपकर
-
अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर
वर्ष २०२३ पासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आतापर्यंत एकूण २१ सराईत तस्करांवर हद्दपारीची धडक कारवाई केली आहे.
बैठकीला प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह ग्रामीण व सागरी भागातील क्षेत्रीय पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

