रत्नागिरी: शासकीय कामांसाठी सरकारी कार्यालयांचे खेटे मारणाऱ्या रत्नागिरीकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. नागरिकांचे प्रश्न त्वरित सुटावेत आणि विविध सरकारी योजनांचा लाभ सहजरीत्या मिळावा, यासाठी आज बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरात विशेष ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ‘जयेश मंगल कार्यालय’ येथे हे शिबिर पार पडत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी प्रांताधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती
या विशेष उपक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रशासकीय यंत्रणेसोबतच लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती लाभणार आहे.
-
प्रमुख लोकप्रतिनिधी: नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, विविध नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य.
-
प्रशासकीय अधिकारी: जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय खात्यांचे अधिकारी आणि पोलीस पाटील उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणार आहेत.
काय आहे ही योजना?
राज्य सरकारच्या निर्देशानुसार, मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे महसुली प्रश्न सोडवण्यासाठी २२, २५ आणि २६ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणी समाधान शिबिरे आयोजित केली जात आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी या शिबिराचा प्रारंभ होत असून, नागरिकांना थेट प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
“शासकीय योजनांचे लाभार्थी आणि रत्नागिरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निवारण करून घ्यावे व विविध योजनांचा थेट लाभ घ्यावा.”
— जीवन देसाई (प्रांताधिकारी) व राजाराम म्हात्रे (तहसीलदार), रत्नागिरी

