रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील नामांकित आणि वर्दळीचे ठिकाण असलेल्या ‘परकार हॉस्पिटल’मध्ये सोमवारी एकाएकी लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील डायलेसिस विभागातील वातानुकूलन यंत्रणेत (AC) अचानक शॉर्टसर्किट झाले आणि पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची ठिणगी पडताच संपूर्ण वॉर्डमध्ये काळपट आणि दाट धूर पसरला. यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांसह ५७ जणांना जीवदान ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी रुग्णालयात एकूण ५७ रुग्ण वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये उपचार घेत होते. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, यामध्ये अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या ७ अत्यंत गंभीर रुग्णांचाही समावेश होता. धुराचे लोट पसरू लागताच रुग्णालय प्रशासनाने विलंब न करता तात्काळ आपली आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय केली.
रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्ड बॉईज यांनी अत्यंत तत्परता दाखवत, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सर्व ५७ रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले. गंभीर रुग्णांना तात्काळ शहरातील इतर जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या या ‘क्विक रिस्पॉन्स’मुळे इतकी मोठी आग लागूनही एकाही रुग्णाला किंवा नागरिकाला साधी दुखापतही झाली नाही.
अग्निशमन दलाची धाव आणि कुलिंग ऑपरेशन घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान बंबांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग विझवल्यानंतरही धूर आणि उष्णता कमी करण्यासाठी बराच वेळ ‘कुलिंग ऑपरेशन’ सुरू होते. प्राथमिक तपासानुसार, पहिल्या मजल्यावरील डायलेसिस रूममधील एसीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळेच (शShort Circuit) ही आग लागल्याचे समोर आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका: डॉ. अलीमिया परकर यांचे आवाहन या थरारक घटनेनंतर परकार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अलीमिया परकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी परिस्थिती स्पष्ट करताना सांगितले, “सर्व रुग्ण पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्यावर इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. अग्निशमन दल आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. नागरिकांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.” सध्या पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या घटनेचा पुढील सखोल तपास केला जात आहे.

