रत्नागिरी: आपला मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे म्हणजे केवळ एका उपकरणाचे नुकसान नसते, तर त्यासोबत अनेक आठवणी, महत्त्वाचा डेटा आणि वैयक्तिक माहितीही धोक्यात येते. मात्र, रत्नागिरीतील १०३ नागरिकांसाठी पोलीस दल खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहे. रत्नागिरी पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञान आणि तत्परतेचा सुरेख संगम साधत शोधून काढलेले १०३ गहाळ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत. आपला गमावलेला फोन पुन्हा हातात मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते.
CEIR प्रणाली अन् सायबर सेलची दमदार कामगिरी
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आलेल्या मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारींचे एकत्र संकलन करण्यात आले. यानंतर सायबर पोलीस ठाणे आणि स्थानिक पोलीस यंत्रणेने अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) तसेच केंद्र सरकारच्या सी.ई.आय.आर. (CEIR – Central Equipment Identity Register) प्रणालीचा अत्यंत प्रभावी वापर केला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी १०३ मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले.
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते मोबाईल वाटप
रत्नागिरी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना (भा.पो.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. मोबाईल मिळताच उपस्थितांनी रत्नागिरी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
नागरिकांना सतर्कतेचे व जागरूकतेचे आवाहन
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांनी सायबर गुन्हेगारी आणि सुरक्षेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “मोबाईल गहाळ किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर त्याची नोंद करावी आणि जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तसेच कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीची (Cyber Fraud) शंका आल्यास किंवा घटना घडल्यास त्वरित रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधावा.”
या विशेष सोहळ्याला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, अमंलदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

