रत्नागिरी: पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कोकणात ‘ऑक्टोबर हिट’चा प्रचंड तडाखा जाणवू लागला असून उन्हाचा कडाका आणि दमट हवामानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी घराघरांत पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रांचा (AC) वापर प्रचंड वाढला आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या वीज वापरावार झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या मागणीत तब्बल २० मेगावॉटची विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी, जिल्ह्याचा एकूण वीज वापर आता १८० मेगावॉटवर जाऊन पोहोचला आहे.
तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पार; उकाड्याने नागरिक बेजार
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा ३९.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने भरदुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोकणातील किनारपट्टीच्या भागातील हवेतील आर्द्रता आणि त्यात तळपणारे ऊन यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. दिवसभराच्या या उकाड्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून घरात वातानुकूलित यंत्रणा आणि कुलरचा वापर सातत्याने सुरू ठेवावा लागत आहे.
घरगुती व व्यापारी वीज वापरात मोठी उसळी
पावसाळ्याच्या दिवसांत हवेत गारवा असल्याने जिल्ह्याची सरासरी वीज मागणी १६० मेगावॉटच्या आसपास स्थिरावलेली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उन्हामुळे अवघ्या काही दिवसांत विजेच्या मागणीत २० मेगावॉटची भर पडली आहे. घरगुती ग्राहकांसोबतच व्यापारी संकुले, हॉटेल्स आणि कार्यालयांमध्येही एसी व कुलिंग उपकरणांचा वापर पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने वीज वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
महावितरण यंत्रणा सतर्क
अचानक वाढलेल्या या विजेच्या मागणीमुळे वीज वाहिन्या, रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि उपकेंद्रांवर भार (लोड) वाढला आहे. तरीही ऐन सणासुदीच्या आणि उष्णतेच्या काळात नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागू नये, यासाठी महावितरणचे तंत्रज्ञ आणि कर्मचारी आवश्यक ती खबरदारी घेत अखंडित वीजपुरवठा राखण्यासाठी कार्यरत आहेत.

