रत्नागिरी: शासकीय कार्यालये म्हणजे सुरक्षित ठिकाण, असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, याच समजाला तडा देणारी एक धक्कादायक घटना रत्नागिरीत समोर आली आहे. रत्नागिरी तहसील कार्यालयाच्या गजबजलेल्या आवारातून एका महिलेची दुचाकी दिवसाढवळ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे शासकीय कार्यालयांच्या आवारातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील तेली आळी येथे राहणाऱ्या ५७ वर्षीय ज्योती प्रकाश कदम यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २५ मे रोजी दुपारी नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयात लोकांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ होती. दुपारी साधारण १:३० वाजण्याच्या सुमारास ज्योती कदम कामानिमित्त तहसील कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी आपली काळ्या रंगाची ‘यामाहा फॅसिनो’ (Yamaha Fascino) दुचाकी (क्रमांक: MH-08-AH-3592) कार्यालयाच्या अधिकृत दुचाकी पार्किंगमध्ये व्यवस्थित पार्क केली आणि त्या आत गेल्या.
मात्र, त्या आपले काम आटपून जेव्हा पार्किंगच्या ठिकाणी परतल्या, तेव्हा त्यांना आपली गाडी तिथे दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला बराच शोध घेतला, मात्र गाडी कुठेही मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा आणि गडबडीचा फायदा उठवत, फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने ही अंदाजे १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
दिवसाढवळ्या आणि तेही थेट शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच दुचाकी चोरीला गेल्याने रत्नागिरीकरांमध्ये कमालीची खळबळ उडाली आहे. “जर सरकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्येच गाड्या सुरक्षित नसतील, तर सामान्यांनी गाड्या पार्क करायच्या कुठे?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या घटनेनंतर रत्नागिरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तहसील परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढत आहेत.

