रिफायनरी आंदोलन ७ जणांना जामीन

51
Bail for 7 persons

बारसू सड्यावर रिफायनरी माती सर्वेक्षण काम थांबवण्यासाठी बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्यावतीने ५ मे रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह ७ आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. या कारवाईनंतर संबंधित गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात आंदोलन केले. गुरूवारी या आंदोलकांची जामीनावर सुटका झाली. आंदोलकांच्या सुटकेनंतर ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. प्रशासनाने बारसू-सोलगाव प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प माती सर्वेक्षणाला स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेऊन या परिसरात जमाव बंदी लागू करुन आंदोलकांना तालुका, जिल्हा बंदी लागू केली होती. प्रशासनाच्या निर्णया विरोधात अमोल बोळे, सतीश बाणे कमलाकर गुरव,नितीन जठार, नरेंद्र जोशी, वैभव कोळवणकर, दीपक जोशी, एकनाथ जोशी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आंदोलकांची बंदी उठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमोल बोळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी बारसू सड्यावर चाल करून सर्वेक्षण थांबवण्याचा प्रयत्न केला असता.

पोलिसांनी अमोल बोळे यांच्यासह आशिष बोळे, रमेश गोरले, सचिन नवाळे, स्नेहल गोरले, अमित चव्हाण, अक्षय बोळे यांना ५ मे रोजी अटक करुन भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४९, ३५३, १८६, १८८ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चा भंग केल्याने कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. ही कारवाई सूडबुद्धीने झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून त्यांची सुटका करावी या मागणीसाठी साखळी उपोषण, मोर्चा, प्रभात फेऱ्या काढून प्रशासनाविरोधात वातावरण निर्माण केले होते. दि. १० मे रोजी आंदोलकांना जामीन मंजूर झाला होता. गुरूवारी दि. ११ मे रोजी त्यांची सुटका केल्याने बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटना पदाधिकारी यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.