अलीकडे तर शाळा-कॉलेजला दुचाकी घेऊन जाण्याचे फॅडच आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील महाविद्यालयाच्या परिसरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकींचा सर्रास वापर होताना दिसत आहे. शिवाय दुचाकी चालवताना वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहतुकीच्या नियम धाब्यावर बसवत एका दुचाकीवर तिघेजण बसणे, स्टाईलमध्ये दुचाकी चालविणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे दुचाकी चालविल्या जातात. यात १८ वर्षांखालील मुलांच्या हातात ५० सीसीच्या वरील दुचाकी देणे कायद्याने गुन्हा असूनही पालक आपल्या मुलांना बिनधास्तपणे दुचाकी देत असतात; परंतु या मुलांना दुचाकी चालवताना काय काळजी घ्यावी याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नसते.
तालुक्यात गेल्या चार वर्षांमध्ये भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये आतापर्यंत तब्बल ३० जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल ५९ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. बेशिस्त गाडी चालवल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. खड्डेमय रस्ते, पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष व जनजागृतीचा अभाव ही कारणे यामागे ठळक दिसत आहेत.
सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या हंगामात पर्यटक जास्त येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकामधून जोर धरत आहेत. वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा मोहीम आखण्यात आली आहे. यावेळी पोलिसांकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, भरधाव वेगाने गाडी चालवू नये, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालवताना घाई करू नये, विनाकारण ओव्हरटेक करू नये, अशा प्रकारच्या जनजागृतीपर सूचना दिल्या जातात पण त्याचे पालन किती केले जाते याबाबत मात्र साशंकता आहे.