खेड तालुक्यातील अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीमधील असगणी येथील हिंदुस्तान कोकाकोला बॅव्हरेजेस’ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असल्याचा दावा करत असगणीतील ग्रामस्थांनी गुरुवारी तोंडावर काळी पट्टी बांधून या कंपनीवर मूक मोर्चा काढला. मोर्चात सहभागी झालेल्या काही ग्रामस्थांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा रोजगार निर्मिती होईल व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु जेव्हा कंपनीचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा रोजगार उपलब्ध झाल्यावर भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस स्थानिक बेरोजगार तरुण व तरुणींना शैक्षणिक पात्रता नसल्याचे कारण दाखवत व्यवस्थापनाने रोजगार देण्यास नकार दिला, असा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराकरिता इतरत्र स्थलांतरित व्हावे लागत आहे.
स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा यासंदर्भात कंपनी व्यवस्थापन व असगणी ग्रामस्थ यांच्यामध्ये दि. ३० मे २०२५ रोजी बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाकडून खोटी आश्वासनेच मिळाली व कंपनी व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला खोटी व चुकीची माहिती देऊन सरपंच, उपसरपंच, कमिटी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्म क कारवाईच्या नोटीस देण्यास भाग पाडले, असा आरोप होत आहे. ‘याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी असगणी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय येथून काळ्या फिती बांधून गुरूवारी कंपनीवर मूक मोर्चा काढला कोकाकोला कंपनीपर्यंत हा मोर्चा गेला आणि पुन्हा हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि तेथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी असगणीच्या सरपंच संजना बुरटे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सुमारे ५५० ग्रामस्थ तसेच कामगार संघटनेचे प्रतिनिधी संजय महादेव आंब्रे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनही उपस्थित होते.