दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत असून, वाहनचालकांना शहरामध्ये वाहने पार्किंग करण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विविध कामानिमित्ताने शहरामध्ये मोठ्या संख्येने ये-जा करणाऱ्या लोकांना पार्किंगसाठी मोकळी वा नजीकची जागा उपलब्ध नसल्याने वाहनांची वर्दळ अन् गर्दीच्या रस्त्यावर, वाहतुकीच्या मुख्य रस्त्यासह बाजारपेठेमध्ये दुकानांसमोर वाहने पार्किंग करून ठेवली जात आहे. त्यामुळे शहरामध्ये दिवसागणिक वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
अनेकवेळा नो पार्किंग फलकांच्या खाली वाहने पार्किंग करून ठेवलेली असल्याने हे नो पार्किंगचे फलक केवळ शोभेचे बाहुले ठरत आहेत. मुख्य रस्त्यासह जवाहर चौकामध्ये होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजनांची आखणी करून काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्याला वाहनचालकांसह नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे.
का होते वाहतूककोंडी ? – राजापूर शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, शहरामध्ये तालुक्याची प्रमुख शासकीय कार्यालयांसह वैद्यकीय सुविधा, राजकीय पक्षांची कार्यालये कार्यरत आहेत. त्याचवेळी शाळा, दवाखानेही शहरामध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून शासकीय कामासह अन्य विविध कामानिमित्ताने लोकांची नेहमीच ये-जा असते. शहरामध्ये कामानित्ताने येणारे अनेकवेळा स्वतःची वा भाड्याची वाहने घेऊन येतात; मात्र शहरातील जिथे मोकळी आणि मोक्याची जागा दिसेल त्या ठिकाणी ही वाहने उभी करून ठेवतात. अनेकवेळा बाजरपेठेमध्ये वा नजीक मोक्याची वा मोकळी पार्किंगसाठी जागा नसल्याने बाजारपेठेमध्ये रस्त्यावर अनेकवेळा वाहनचालकांकडून वाहने उभी करून ठेवली जातात. रस्त्यावर एकाच ठिकाणी तासनतास ही वाहने उभी राहिल्याने वाहतूककोंडी होते.
आठवडा बाजारादिवशी शिस्तीचा अभाव – शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेली बाजारपेठ आणि परिसरामध्ये वाहतूककोंडी असताना तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यासमोर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवलेली असल्याने अनेकवेळा वाहतूककोंडी होते. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आणि गुरुवारी शहरामध्ये भरणारा आठवडा बाजार या दिवशी शासकीय कामांसह अन्य कामानिमित्ताने मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांकडून तहसील कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून ठेवलेली असतात. ही वाहने या भागातील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरताना दिसत आहेत. कोदवली नदीच्या काठावरील शिवाजीपथवर दोन्ही बाजूला रिक्षा, दुचाकी, छोटे टेम्पो आणि माल उतरवण्यासाठी आलेल्या मोठ्या गाड्या पार्किंग करून ठेवलेल्या असतात. त्याच्यातूनही शिवाजीपथ रस्त्यावर अनेकवेळा वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.
नो पार्किंग फलक शोभेचे बाहुले – ज्या भागामध्ये अनेकवेळा वाहतूककोंडी होते त्या भागामध्ये राजापूर नगरपालिकेने नो पार्किंगचे फलक लावले आहेत; मात्र या नो पार्किंग फलकाच्या खाली वा त्या ठिकाणी नागरिकांकडून अनेकवेळा विनदिक्कतपणे वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात. त्यातून, त्याच भागामध्ये वाहतूककोंडी होते. त्यातून, नो पार्किंगचे फलक तयार करणे आणि फलक उभारणीसाठी राजापूर नगरपालिकेकडून केला जाणारा खर्च फुकट जात आहे. साधा लावलेला फलकही पाहण्याची तसदी नागरिक वाहन लावताना घेत नाहीत.
ठोस उपाययोजनांची आवश्यकता – वर्षानुवर्षे भेडसावत असलेली शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका, आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस
पोलिस प्रशासन उपाययोजनांची – आखणी होणे गरजेचे आहे. केवळ ठोस उपाययोजना करून उपयोग नाही तर त्याची सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्याला वाहनचालकांसह ग्रामस्थांनाही सकारात्मक प्रतिसादही देणे गरजेचे आहे.