दापोली किनारपट्टीवर गेल्या काही वर्षात तब्बल ३७ किलो चरस सापडला असून कस्टम विभागाने २२२ किलोग्रॅम चरस जप्त केला असून याबाबतची अधिक चौकशी सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांना सांगितले. या अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ ते ७ कोटी रूपये इतकी आहे. इतक्या मोठ्याप्रमाणावर चरस इथे आला कसा याची चौकशी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कर्दे, मुरूड, कोळथरे आदी ठिकाणी १४ ऑगस्ट रोजी चरसची पॅकेटस् आढळली. कस्टम विभागाने ती जप्त केली. त्यानंतर दापोली पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविले. एकूण ३७ किलो चरस सापडला. यासंदर्भात बोलताना डीएसपी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, गुहागर किनारपट्टीवरही यापूर्वी अशीच पाकिटे सापडली होती. त्यासंदर्भात गुजरात एटीएस विभागाने कारवाई केली.
आपण आता गुजरात एटीएसशी संपर्क साधला आहे. पोलिसांसह कस्टम विभागालादेखील २२२ किलोग्रॅम वजनाची चरस पाकिटे सापडली आहेत. १ कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीची ही पाकिटे असून ती नेमकी आली कुठून? याचा शोध सुरू आहे. अफगाणीस्तान देशाचा मार्क या पाकिटांवर आढळतो. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे बोलले जाते. दरम्यान, पोलीस आणि कस्टम या दोघांना मिळून एकूण २५९ किलो चरस पाकिटे मिळाली आहेत. बाजारभावाचा विचार केला तर त्याची किंमत ६ ते ७ कोटी रूपयांच्या घरात जाते. याचा अधिक तपास सुरू आहे.