परराज्यांतून नागरिक कोकणात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला येत आहेत. वर्षानुवर्षे स्थायिक झालेले परप्रांतीय दक्षिणेकडील होते. परंतु, आता उत्तरेकडीलही परप्रांतीयांची संख्या कमालीची वाढली आहे. आता वाढलेला हा परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात पडणार, यावरही निकाल अपेक्षित आहे. परप्रांतीयांचा प्रत्येक व्यवसायातील प्रवेश हे स्थानिक व्यावसायिक आणि बेरोजगारांच्या रोजगारावर गदा आणणारे ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदारसंघांत जोरदार लढत अपेक्षित आहे. किंबहुना तशी लढत सध्या सुरू आहे. बुधवारी (ता. २०) मतदान होईल. मात्र, या खऱ्या अर्थाने एकगठ्ठा मत कोणाच्या पारड्यात पडणार, यालाही फार महत्त्व आहे. किमान तशी चर्चा रंगत आहे. कोकणात परप्रांतीयांना थारा देऊ नका, असे समाजमाध्यमांतून सांगितले जाते. मात्र, व्यवसायासाठी स्थायिक झालेले परप्रांतीय जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे ठरणार आहेत. कोकणात सुरुवातीच्या काळात दक्षिणेकडील नागरिक दाखल झाले.
वाहनांचे टायर पंक्चर काढणे हा व्यवसाय केरळ राज्यातील अनेकांनी कोकणात सुरू केला. याशिवाय, केरळची मंडळी बेकरी व्यवसायामध्येही कोकणात उतरली. त्यानंतर, चिरेखाण व्यवसायामध्ये कर्नाटकातील बहुतांश नागरिक हे मजुरीसाठी कोकणात आले. अनेक जण आता येथे स्थिरावले आहेत. चिरेखाण व्यवसाय असलेल्या आणि वाहतूक होणाऱ्या शहरांमध्ये अशा कर्नाटक मजुरांच्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत. आता, ते कोकणातले कायमस्वरूपी नागरिकही झाले आहेत.. त्यांच्याकडे मतदानाचा हक्क आहे. अशाच पद्धतीने हात” व्यवसायासाठी आलेले गुजराती समाजातील अनेक नागरिक गावागावांपर्यंत जाऊन स्थिरावले आहेत. उत्तर भारतीयांचा भरणा हा अलीकडच्या कालावधीमध्ये झाला आहे. ज्या वेळेपासून शहरी भागांमध्ये इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू झाले. त्यामध्ये उत्तर भारतीय मजुरीसाठी आले आणि आता ते कोकणामध्ये बांधकाम व्यावसायिक झाले आहेत. अनेकांनी स्वतःच्या इमारतीही उभारल्या आहेत. मासेमारी, वाळू व्यवसाय असो, अनेक परप्रांतीय आता येथे स्थायिक झाले आहेत.
स्वतःच्या कुटुंबासाठी येथे त्यांनी निवास व्यवस्थाही केली आहे. या परप्रांतातील नागरिकांची स्वतंत्र मंडळे आहेत. गुजराती समाज नवरात्री उत्सवात प्रत्येक शहरात स्वतःचा वेगळा गरबानृत्य कार्यक्रम करतात. या समाजाने मोठी सभागृहे आणि मंदिर उभारले आहे. अलीकडे तर उत्तर भारतीयांची छटपूजा प्रत्येक शहरी भागात साजरी होते. शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये आजवर मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. अशा मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही परप्रांतीय मुले शिकत होती. पण, आता त्यांना इंग्रजी माध्यमाचा पर्याय गावागावांतही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हिंदी भाषक राज्यातील मजूरदार असो किंवा मोठे व्यवसाय हे स्थिरावल्यानंतर येथे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये त्यांची मुले शिक्षण घेत आहे. असा हा उत्तर भारतीय गुजराती आणि दाक्षिणात्य नागरिक कोकणात स्थिरावला आहे. सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये याचे सर्वाधिक प्रमाण आहे. अलीकडे आंबा बागामध्ये काम करणारे नेपाळी नागरिकही वाढले आहेत.
त्यामुळे परप्रांतांबरोबरच नेपाळचा नागरिक पुढच्या काळामध्ये कोकणातला रहिवासी झाला तर नवल वाटू नये, अशी स्थिती सध्या आहे. गेल्या काही वर्षांपासून बेकरी, हॉटेल, हार्डवेअर, कापड विक्री, कटलरी व्यवसाय, वाळू उत्खनन, मासेमारी आणि मासेविक्री अशा व्यवसायामध्ये स्थिरावलेला हा परप्रांताचा नागरिक कोकणात आता मतदार झाला आहे. या मतदारांचा प्रभाव हा कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. प्रत्येक गावामध्ये एक- दोन टक्के हा मतदार असले तरी ते उमेदवारांच्या मतांमध्ये भर टाकणारे ठरणार आहेत. याचा लाभ ठराविक उमेदवारांना निश्चितपणे होईल, अशी चर्चा आहे. या मतदारांना गोंजारण्यासाठी बैठकाही घेतल्या आहेत. आता, त्याचा प्रभाव या परप्रांतीय मतदारांवर किती पडणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.