अलोरे- वरचीवाडी येथे पायवाटेसाठी ६५ मीटर लांबीची ग्रामपंचायतीला तीन ते चार फुटांची जागा विनामोबदला दिली होती; मात्र कुटुंबातील सहहिस्सेदारांच्या सह्या न घेताच त्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या. शिवाय तीन-चार फुटाची जागा दिली असताना १० फूट रस्ता केला जात आहे. वाढीव रस्त्याला आमचा विरोध असून, रस्त्यासाठी जागा देत नसल्याने ग्रामस्थांनी आम्हाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळते, अशी कैफियत अलोरे-वरचीवाडी येथील अनंत शंकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेत माडंली. रस्त्याबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करताना अनंत चव्हाण म्हणाले, ‘अलोरे वरचीवाडी येथे पाऊलवाटेसाठी ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार ३ ते ४ फूट रूंदीची ६५ मीटर लांब जागा विनामोबदला दिली होती.
त्याकरिता आईने व मी कोऱ्या स्टँप पेपरवर सह्या केल्या होत्या; मात्र याच जागेत सहहिस्सेदार असलेल्या बहिणींची संमत्ती घेतली नव्हती. कालांतराने ग्रामपंचायतीकडे असलेल्या रस्त्यांच्या नोंदीबाबत माहिती घेतली असता बहिणींच्या सह्या मारून संमत्तीपत्र केल्याचे दिसून आले. त्यावर आमचा आक्षेप आहे. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या समक्ष सह्या केल्याचे दाखवले आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही बहिणींच्या खऱ्या सह्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षात ३-४ फूट पाऊलवाटेसाठी तोंडी संमती असताना ७ ते १० फुटाचा पक्का रस्ता केला जात आहे.
त्यासाठी शासनाने १० लाखाचा निधी देखील दिला असून, त्यापैकी याच रस्त्यावर १० लाख खर्च झाले आहेत. पाऊलवाटेचे वाढीव काम केले जात असल्याने जमीन शिल्लक राहत नाही. वाडीतील ग्रामस्थांना हाताशी धरून दडपशाहीची भूमिका केली जात आहे. रस्त्यासाठी बेकायदा केलेले नियमबाह्य असलेले संमतीपत्र रद्द करण्यात यावे. गटविकास अधिकाऱ्यांनी आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वीही पंचायत समितीने आश्वासने दिली होती; मात्र आता न्याय न मिळाल्यास पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अनंत चव्हाण यांनी दिला आहे.