HomeRatnagiriपूर नियंत्रणासाठी २२०० कोटींचा प्राथमिक आराखडा - आमदार शेखर निकम

पूर नियंत्रणासाठी २२०० कोटींचा प्राथमिक आराखडा – आमदार शेखर निकम

३५० कोटींची विकासकामे होऊनही विधानसभा निवडणुकीत आमदार निकम पिछाडीवर राहिले.

पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ उपशाच्या कामासाठी निधीची अडचण भासणार नाही. पुरनियंत्रणासाठी नलावडा बंधाऱ्यास २१ कोटी मंजूर असून, नदिकिनाऱ्यावरील उर्वरित संरक्षक भिंतीसाठी २२५ कोटीची आवश्यकता असून, त्यास लवकरच मंजुरी मिळेल. पूर नियंत्रणासाठी २२०० कोटींचा पूर्व प्राथमिक आराखडा येत्या दहा-पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करावा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील नलावडा बंधारा येथे पूरनियंत्रणासाठी २१ कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंत कामाचा प्रारंभ आमदार निकम यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) करण्यात आला. ते म्हणाले, ‘२००५ आणि त्यानंतर २०२१ ला महापुराने चिपळूणला उद्ध्वस्त केले. महापुरानंतर शहर परिसरातील पूरनियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. गेल्या पाच वर्षांत शहरासाठी ३५० कोटीचा निधी आणला.

नदी किनारच्या भागात संरक्षक भिंतींसाठी २२५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत चिपळूणचा प्रश्न पोहोचलेला आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवल्याने सारे प्रश्न लवकर सुटतील. शहरातील पूर नियंत्रणासाठी २२०० कोटींचा पूर्व प्राथमिक आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला आहे. तो आराखडा नेमका कसा आहे, त्यामध्ये काय समाविष्ट आहे, अजून काय करता येईल याबाबत सर्वांनी लेखी स्वरूपात जनतेने निवेदन दिल्यास त्यावर चर्चा करून योग्य ती दुरुस्ती केली जाईल. यासाठी लवकर तो आराखडा जलसंपदा विभागाने जनतेसाठी खुला करावा.’माजी नगरसेवक अरुण भोजने म्हणाले, ‘नलावडा बंधाऱ्याचे सुरू झालेले काम शहरासाठी मोलाचे आहे. पूर नियंत्रणाची अर्धी लढाई जिंकली आहे. 

२००५ मध्ये नलावडा बंधारा फुटल्यानंतर तो पुन्हा बांधण्यासाठी आजपर्यत कुणाला जे जमलं नाही, ते आमदार निकमांनी करून दाखवले.’ यावेळी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपअभियंता विपूल खोत, राजेश वाजे, शाहनवाज शाह, मंगेश पेढांबकर, अनंत मोरे, संदेश आयरे, उपाध्यक्ष शौकत मुकादम, पूजा निकम,मिलिंद कापडी, उदय ओतारी, आशिष खातू, विजय चितळे, विनोद भोबस्कर, रवींद्र तांबीटकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कामे करूनही विधानसभेला पिछाडीची खंत – गेल्या पाच वर्षांत चिपळूण शहरात तब्बल ३५० कोटींची विकासकामे होऊनही विधानसभा निवडणुकीत आमदार निकम पिछाडीवर राहिले. या कार्यक्रमात निकम यांनी हसत हसता आपली खंत बोलून दाखवली. २०१९ च्या निवडणुकीत शहरात काही काम केलेले नसतानाही शहराने मला आठ हजारांचे मताधिक्य दिले. आता कामे करूनही अडचण होतेय की काय असं मला वाटतंय. पण, आता तो महत्त्वाचा विषय नाही. शहर आणि मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने काम करत राहणे हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular