कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जंगलात ८ वाघांचे अस्तित्व असल्याचे निदर्शनास आले आहे. हे वाघ मानवी हस्तक्षेपा पासून काही अंतर दूर असलेल्या जंगलात असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. गोवा आणि कर्नाटक भागातून काही वाघ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येतात. गुरांची शिकार करण्यासाठी काही भागात वाघांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाघांची संख्या आणि कोणकोणत्या भागात वाघ जास्त सक्रीय आहेत, त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणी प्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींबाबत माहिती जाणून घेतली आहे. वाघ जिथे जास्त प्रमाणत वावरू शकतात अशा पाणवठे आणि इतर ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले. त्यात मागील दोन वर्षांपासून सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वाघांची भ्रमंती आढळून आली आहे. २०१४ पासून वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट ही संस्था कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकणात ये-जा करणाऱ्या आणि काही ठराविक भागांमध्ये वावरणाऱ्या वाघांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे.
कोकणामध्ये देखील या संस्थेला वाघांची एक जोडी फिरताना आढळली होती. तर अन्य सहा वाघ हे स्थानिक आहेत की, गोवा आणि कर्नाटकमधून येतात यावर संशोधन सुरु आहे. नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात २२ ठिकाणी प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवला गेला असून, काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले गेले. या सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
विशाल माळी, विभागीय वनाधिकारी कोल्हापूर, कोकणातील संगमेश्वर, देवरुख, चिपळूणसह अन्य भागात असलेल्या घनदाट जंगलात वाघांची भ्रमंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जनावरांना तातडीने नुकसानभरपाई दिली जात आहे; मात्र वाघांचे अस्तित्व सिद्ध होणे ही आनंदाची बातमी आहे.

