एसटी महामंडळाचे दिवस पालटायला सुरुवात झाली आहे. कोरोना आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या संप काळामध्ये एसटी महामंडळाची अवस्था खूपच दयनीय बनली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला ३६० कोटी रुपये आवश्यक असतात. परंतु नवीन आलेल्या शिंदे सरकारकडून तीन महिन्यामध्ये केवळ ६०० कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. वस्तुतः एसटी महामंडळाकडून ७३८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु, आता केवळ ३०० कोटी रुपयेच देण्यात आले आहेत.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला तातडीने ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते, पण राज्य सरकारने मात्र फक्त ३०० कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला सज्जड इशाराच दिला आहे.
सरकारनं आम्हाला आवश्यक आहे आणि जेवढी मागणी केली तेवढाच निधीचा पुरवठा करावा, जर कमी निधी पुरवला तर तो अपुरा पडतो. योग्य निधीचा पुरवठा झाला नाही तर सरकार विरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा बरगे यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

