आर्थिक सबलीकरणासाठी शासनस्तरावर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गावागावांमध्ये महिला बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे १४ हजार बचत गट आहेत. २ वर्षाच्या कोरोनाच्या संकटा पश्चात यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. बालदोस्तांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण सणामध्ये आनंद घेत मशगुल झाली आहेत. दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानासह चकल्या, करंजी, लाडू, चिवडा यांसह विविध प्रकारच्या फराळाचा आस्वाद घेतला जातो. घरामध्ये बनवलेल्या या फराळाची चव न्यारीच असते. ग्रामीण भागामध्ये महिला बचतगटांकडून आलेल्या फराळाला मोठी मागणी होती. या सणाचा व्यावसायिक फायदा मिळवण्यात उमेदच्या महिला बचतगटांना यश आले आहे.
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बाजारपेठेतील ठिकाणांसह मुंबई व पुण्यामध्येही बचतगटांचा फराळ पोचला आहे. कोरोनानंतर बचतगटांच्या अर्थकारणाला दिशा मिळत असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) गटांनी भरारी घेतली आहे. उमेदमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विविध शासकीय कार्यालये, गावागावातील मुख्य बाजारपेठांमध्ये बचतगटांचे स्टॉल उभारले होते. शंभरहून अधिक ठिकाणी अशी व्यवस्था केली गेली. याचबरोबर मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागातून बचतगटातील महिलांच्या वैयक्तिक संपर्कामधूनही फराळाची मागणी आली होती. दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यंत मागणीनुसार फराळ पोचता करण्यात आला.
दरम्यान, फराळासह आकाशकंदील, मातीच्या पणत्या, दिवाळी साहित्य विक्रीतून महिला बचतगटांनी दिवाळी सणात सुमारे २५ लाखाहून अधिक आर्थिक उलाढाल केल्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवाळीत बचतगटांना विक्रीसाठी पर्याय उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्यासह उमेदच्या प्रकल्प संचालक एन. बी. घाणेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे यांनी दिवाळीपूर्वीच नियोजन केले होते. त्याची अंमलबजावणी तालुकास्तरावरही प्रत्यक्षात केल्यामुळे महिलांना बाजारपेठ मिळाली.

