१ नोव्हेंबर पासून पावसाळी रेल्वे वेळापत्रकामध्ये बदल झाला असून, रेल्वेचे नियमित वेळापत्रक सुरु झाले आहे. त्याचप्रमाणे जसा वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे तसाच काही थांब्यांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाचे काम सुरु असल्याने देखील वाहतूकीमध्ये काही तासांचा फरक पडत आहे.
मुंबईतील सीएसएमटी ते मस्जीद बंदर स्टेशन या दरम्यानचे कर्नक ब्रीज हटविण्याचे काम १९ व २० नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. त्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या प्रथम व अंतिम थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकापर्यंत असणाऱ्या काही गाड्या या केवळ दादर, तर काही गाड्या पनवेलपर्यंतच धावणार आहेत.
यात १९ व २० ची मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस या गाड्या दादरपर्यंत, १९ ची मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस मेंगलोर सीएसएमटी एक्स्प्रेस, २० ची मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस या गाड्या पनवेलपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील गाड्यांची व्यवस्थित माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीएसटीहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या दादर, तर काही गाड्या पनवेलमधून सुटणार आहेत. यात २० ची सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेस, तेजस एक्सप्रेस दादर येथून, तर २० ची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, २० ची सीएसएमटी-मेंगलोर एक्सप्रेस, १९ व २० ची सीएसएमटीमडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल येथून सुटणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी देखील प्रवासाला निघण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घेऊन प्रवास करून सहकार्य करावे.

