25.1 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgसिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांनी पसरले पाय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांनी पसरले पाय

मुलांबरोबरच मुलींनाही या जाळ्यात अडकविण्याचे प्रकार सुरू आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अमली पदार्थांचा घट्ट विळखा पडू लागला आहे. त्यांचे नेटवर्क अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. शाळकरी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून ‘टार्गेट’ करत भावी पिढी बरबाद करण्याचा सामूहिक कट तर रचला जात नाही ना?, अशी शंका घ्यायला वाव असावा, अशी स्थिती आहे. हे नेटवर्क सोशल मीडियाचा वापर करत झपाट्याने विस्तारत आहे. सिंधुदुर्ग सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जाते. उघड होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारीसुद्धा तशीच आहे; मात्र वास्तव खूप वेगळे आहे. अवैध दारू व्यापाराने गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्गाला आतून पोखरले आहे.

याच्या तस्करी ते ग्राहक या साखळीत तरुणांना ओढले जात आहे. ही स्थिती कमी म्हणून की काय, आता अमली पदार्थांचा विळखा जिल्ह्याला पडला आहे. पाच वर्षांत हे नेटवर्क झपाट्याने वाढून अगदी गावापर्यंत पोहोचले आहे. नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेले तरुण यांच्या टार्गेट ग्रुपवर आहेत. सुरुवातीला कुतूहल म्हणून गांजा व इतर अमली पदार्थांची चव चाखलेले या नशेच्या अधीन होत आहेत. त्यांचे ग्रुप बनून सामूहिक नशा करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यासाठीचे ‘सप्लाय नेटवर्क’ खूप गुप्तपणे चालत असल्याची स्थिती आहे. बरेचसे नेटवर्क लगतच्या गोव्याला जोडले आहे. शिवाय मुंबई, ठाण्यातूनही अमली पदार्थ येथे पुरविले जात आहेत. गांजा अधिक प्रमाणात वापरला जात आहे.

अशा अमली पदार्थांची चटक लागलेल्यांचाच वितरण साखळीसाठी वापर केला जात आहे. अमली पदार्थ व्यसन थेट मनोव्यापारावर अर्थात मानसिक स्थितीवर परिणाम करते. ठराविक काळानंतर संबंधित ड्रग्ज न मिळाल्यास व्यसनाधीन झालेले अस्वस्थ होतात. याच अस्वस्थतेचा गैरफायदा घेऊन हे नेटवर्क चालविले जात आहे. यातील मास्टरमाईंड नामानिराळे राहत असल्याने हा विळखा तोडून टाकणे सोपे राहिलेले नाही. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. विशिष्ट ‘कोडनेम’ असलेली सोशल मीडिया अकाऊंट तयार करून अमली पदार्थांची वितरण साखळी चालविली जात आहे.

मुलांबरोबरच मुलींनाही या जाळ्यात अडकविण्याचे प्रकार सुरू आहेत. यासाठी ग्राहक शोधताना २० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील स्वैर विचार करणाऱ्या मुलांना लक्ष्य केले जाते. विशेषतः नवश्रीमंत, नोकरदार, कुटुंबातील मुले रडारवर असतात. त्यांच्याकडे अधिक सहज ‘इझी मनी’ मिळू शकतो. एकदा या जाळ्यात मुले ओढली गेली, की त्यांची साखळी वाढवत नेली जाते. शहरी भागातील शिक्षणाशी संबंधित संस्था असलेल्या भागात अशा अमली पदार्थ साखळीचा वावर जास्त असतो.

त्यांनी आपली व्याप्ती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत व्याप्ती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविली आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रामुख्याने गांजा सापडला आहे; मात्र इतर अमली पदार्थांचा व्यापारही काही प्रमाणात होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यस्थितीत सिंधुदुर्ग पोलिस वगळता या विरोधात कोणतीच यंत्रणा सक्रिय नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनाही त्यांच्या व्यापातून यासाठी वेळ द्यायला मर्यादा आहेत. या सगळ्या स्थितीचा गैरफायदा घेऊन सिंधुदुर्गात हे नेटवर्क खूप वेगाने विस्तारत आहे

RELATED ARTICLES

Most Popular