खेड शहराचा विस्तार दिवसागणिक वाढत असताना अजूनही वाहने उभी करण्यासाठी नगरपालिकेकडून जागेची निश्चिती करण्यात आलेली नाही. बाजारासाठी येणारे अनेकजण रस्त्यालगतच वाहने उभी करत असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधीचौकातील स्तंभानजीक उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकींमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. येथील पोलिस यंत्रणेने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बाजारपेठेतही बेदकारपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शहरात वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. खांबतळ्याजवळील शंकराच्या मंदिर परिसरात मालवाहतुकीची वाहने उभी करण्यास मुभा दिली आहे.
हा अपवाद वगळता पालिकेने वाहने उभी करण्यासाठी जागेची निश्चिती न केल्यामुळे वाहने उभी करायची तरी कुठे? असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. सद्यःस्थितीत स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह परिसरात चारचाकी वाहने उभी केली जात असून, ही जागा वाहनतळ बनली आहे. याशिवाय अनेकजण बसस्थानकातील मोकळ्या जागेत दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे बसेस उभ्या करताना अडथळा होतो. एसटी प्रशासनाने येथे ‘नो-पार्किंग’ असा फलकही लावला आहे. मात्र फलक लावलेल्या ठिकाणीच दुचाकी उभ्या केल्या जातात. दोन्ही बाजूकडील मोकळ्या जागेसह नियंत्रण कक्षालगतच्या जागेतही दुचाकी उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाटणे व्यापारी संकुलासमोरील मोकळी जागाही वाहनतळ बनली आहे. व्यापारी संकुलातील व्यावसायिकांव्यतिरिक्त अन्य काहीजण या ठिकाणी दुचाकी उभी करतात. त्यामुळे येथेही वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. या पाठोपाठ बाजारपेठेतही वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवरच आला आहे. पालिकेला एकदिशा मार्गाची अंमलबजावणी करण्यास अद्यापही सवडच मिळालेली नाही. केवळ नावापुरते फलक लावण्याचे सोपस्कार पार पाडण्यावरच पालिकेने समाधान मानले आहे. बाजारपेठ दिवसेंदिवस वाहतूककोंडीच्या विळख्यात अडकत चालली आहे.