तालुक्यातील ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात तयार होत असलेला हापूस आंबा मे अखेरीस हाती येणार आहे. याच कालावधीत अवकाळी पावसाचे आगमन होते. त्यामुळे तयार होणारा आंबा पावसाच्या तडाख्यात सापडणार आहे. यामध्ये आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चिपळूण तालुक्यात यावर्षी हापूस आंब्याचे पीक समाधानकारक आहे. मात्र, अनेक झाडांना उशिरा फळधारणा झाली आहे. तयार झालेला आंबा सध्या बाजारात विक्रीसाठी आला आहे; परंतु झाडावर असलेल्या आंब्याचे प्रमाण जास्त आहे. तो मे महिन्यात तयार होणार आहे.
मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर आंबा बाजारात येतो त्यामुळे दर घसरतात. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर आंब्याचे नुकसान होते. त्यामुळे विक्रेते आणि बागायतदार मिळेल त्या किमतीत आंबा विकतात परिणामी, बागायतदार आणि विक्रेते दोघांचेही नुकसान होते. यावर्षी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बाजारात सध्या हापूस आंब्याला चांगले दिवस आहेत. शेकडा चार हजार रुपये दराने हापूस आंब्याची विक्री सुरू आहे. काही विक्रेत्यांनी झाडावर लागलेला आंबा घाऊकमध्ये विकत घेतला आहे तर काही बागायतदार नगावर आंबा विक्री करत आहेत. बागायतदार मोठा आंबा ३ हजार २०० रुपये आणि लहान आंबा तीन हजार रुपये दराने विकत आहेत. जे बागायतदार थेट आंबा विक्री करतात त्यांना ८०० ते हजार रुपये जादा मिळत आहेत.
अवकाळी पाऊस झाल्यानंतर आंबा खराब होतो. आंब्यावर बाहेरून काळे डाग पडतात, हे ग्राहकांना माहीत असल्यामुळे आंब्यावर पाऊस पडल्यानंतर ग्राहक आंबा जास्त किमतीत विकत घेत नाहीत. त्यामुळे विक्रेते आणि बागायतदारांचे मोठे नुकसान होते. यावर्षी बहुतांश आंबा अजूनही झाडावर असून, तो अद्याप तयार झालेला नाही. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांत तो तयार होण्याची शक्यता आहे. काही बागायतदार नैसर्गिकरित्या आंबा पिकण्याची वाट न बघता कच्चा आंबा काढून तो कृत्रिमरित्या पिकवून विकत आहेत. हापूस आंब्याला मागणी चांगली आहे. मात्र, आंबा पुरेसा उपलब्ध होत नसल्यामुळे काही विक्रेत्यांनी थेट रत्नागिरीतून हापूस – आंबा आणण्यास सुरुवात केली आहे.