श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे मंगळवारी (२१ ऑक्टोबर) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्याजी यांचा जन्मोत्सव सोहळा आनंद, उत्साह व चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. या आनंद सोहळ्यात नरेंद्राचार्याजींचे लाखो अनुयायी सहभागी झाले होते. दिवसभर अवघा सुंदरगड भक्तांनी फुलून गेला होता. दरम्यान पर्यावरण जागृतीचा संदेश देणाऱ्या ३ वसुंधरा दिंड्यांचे मंगळवारी सुंदरगडावर प्रचंड उत्साहात आगमन झाले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या नरेंद्राचार्याजी महाराजांच्या या उपक्रमाचे महाराष्ट्रभर मोठे कौतुक झाले. दरम्यान जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह आमदार व विविध पक्षांच्या नेत्यांनी, सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नाणीजमध्ये येऊन महाराजांना शुभेच्छा दिल्या. सुंदरगडावर मंगळवारी दिवाळी साजरी झाली. दिवाळीनिमित्ताने खास कार्यक्रमाचे पहाटे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज यांचे पहाटे ५ वाजता सुंदरगडावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत सौ. सुप्रियाताई, प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. ओमेश्वरीताई, नातू देवयोगी असे सारे कुटुंबिय उपस्थित होते. दिवाळीनिमित्ताने भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. नरेंद्राचार्याजींसमवेत सर्वांनी एकत्र दिवाळीचा फराळ केला. भाविकांसाठी दिवाळी व जन्मोत्सव एकत्र आल्याने दुधात साखर असे वातावरण होते.
अनेक नेत्यांची उपस्थिती – या सोहळ्यासाठी अनेक नेत्यांची, शासकीय अधिकाऱ्यांची आवर्जून उपस्थिती होती. त्यांनी नरेंद्राचार्याजींचे पुष्पहार घालून अभिष्टचिंतन केले. आशीर्वाद घेतले. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत, आम दार शेखर निकम, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जि.प. चे माजी सभापती परशुराम कदम, महेश म्हाप आदींचा त्यामध्ये समावेश होता. पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शुभेच्छा देताना नरेंद्राचार्याजींच्या वृक्षलागवड, देहदान, रक्तदान या सामाजिक कार्याचा गौरवाने उल्लेख केला.
सामुदायिक लक्ष्मी पूजन – सुंदरगडावर दुपारी ३ वाजता सामुदायिक लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला. वे.शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचेगुरूजी यांनी विधीवत पूजा सांगितली.
यागाची समाप्ती – मंगळवारी सकाळी नैमित्तिक पूजाविधी व मंत्रघोषाने जन्मोत्सव सोहळ्याची सुरूवात झाली. सोमवारी सुरू झालेल्या सप्तचिरंजीव महामृत्यूंजय यागाची मंगळवारी समाप्ती झाली, त्यानंतर प्रवचनकार पदवीदान समारंभ झाला. संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचेगुरूजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी झालेल्या मंत्रघोषाने परिसर भारावला. एक अनोखे चैतन्य वातावरणात साऱ्यांनीच अनुभवले.
३ दिंड्यांचे आगमन – यावेळच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून ७ उपपिठांवरून निघालेल्या पर्यावरण जागृती करणाऱ्या ७ वसुंधरा दिंड्यापैकी ३ दिंड्यांचे नाणीजक्षेत्री मंगळवारी आगमन झाले. सर्वप्रथम सकाळी १० वाजता तेलंगणा दिंडीचे आगमन झाले. त्यानंतर नाशिक व दुपारी पुणे येथून निघालेल्या दिंडीचे आगमन झाले. दिंड्यांच्या स्वागतासाठी पीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज स्वतः उपस्थित होते. सर्व भक्तांनीही या उपक्रमाचे जल्लोषात स्वागत केले.
वृक्षारोपणाचे आवाहन – निसर्ग संरक्षण हा संदेश या दिंड्यांच्या माध्यमातून पोहोचविण्यात आला. येथे अध्यात्माबरोबर ग्लोबल वॉर्मिंगबाबत जागृती केली जात होती. ग्लोबल वॉर्मिंगचे फटके माणसाला विषेशतः शेती व शेतकऱ्यांना म ोठ्या प्रमाणात बसत आहेत. मोठ्या वृक्षतोडीमुळे असे होत आहे. त्यासाठी झाडे लावण्याबाबत जागृती या दिंड्यांनी केली. वाटेत मुक्कामाच्या ठिकाणी झाडे लावली. ती जगतील कशी यावरही काम सुरू झाले आहे. सर्व दिंड्यांच्या माध्यमातून १ लाख झाडे लावण्यात आली आहेत.
रात्री प्रवचन आणि औक्षण – दिवसभराच्या विविध कार्यक्रमानंतर रात्री प्रथम, प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. यानंतर परमवंदनीय जगद्गुरू नरेंद्राचार्याजी यांचे अमृतमय प्रवचन झाले. यामध्ये त्यांनी अध्यात्म व विज्ञान याची सांगड घालून वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले. सद्गुरूंचे महत्व आयुष्यात काय असते, चांगले सद्गुरू मिळणे किती महत्वाचे आहे, शिष्य, भक्तांनी सद्गुरूंच्या सान्निध्यात असणे किती महत्वाचे आहे याबाबतचा उपदेश त्यांनी यावेळी केला.
जन्मोत्सव सोहळा – प्रवचन झाल्यानंतर जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. आरती म्हटली गेली. शौचेगुरूजींनी संतपीठावरून सूचना देताच समोर बसलेल्या हजारो भक्तांनी निरांजने प्रज्वलीत केली. हाताला हात लागले आणि सर्वांनी रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचे औंक्षण व अभिष्टचिंतन केले. रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजींनी सर्वांना आशीर्वाद दिले. देवाला साकडे घालून वारी उत्सवाची सांगता झाली.
महाप्रसाद, आरोग्य शिबिर – दोन्ही दिवस भाविकांसाठी २४ तास महाप्रसादाची व्यवस्था होती. भक्त रांगा लावून प्रसाद घेत होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता मोफत आरोग्य शिबिराची पुन्हा सुरूवात झाली. येथे नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार सुरू केले. बुधवारपर्यंत हे शिबिर सकाळी ९ ते सायं ७ या वेळेत सुरू राहील. त्याचा लाभ दूरवरून आलेले भाविक घेताना दिसत आहेत. २२ रोजी गुरुकृपा यज्ञ सोहळा आहे. यावेळी ७पिठावरील पादुकांची विधियुक्त शक्ती स्थापना होईल. मंगळवारी चरण दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. गुरूंचे अभिष्टचिंतन आपल्या करण्यासाठीदेखील अनुयायांची लगबग सुरू होती. कोण पुष्पहार घालीत होते, कोण चरणावर डोके ठेवीत होते. कोण घरून आणलेली एखादी भेट देत होते. नरेंद्राचार्याजी महाराज सर्वांचे हे प्रेम स्विकारत आशीर्वाद देत होते. दुसरीकडे सुंदरगड व नाथांचे माहेर येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. सर्व भाविक रांगेने दर्शन घेत होते. मंदिरे व संतपीठ आकर्षक रोषणाई व पाना-फ लांनी सजवले होते. दोन दिवस एस.टी. ने जादा गाड्या सोडल्या आहेत.

