राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी झाले आहेत. हा शिवसेना कार्यकत्यांनी घेतलेल्या मेहनतीचा मोठा विजय आहे. आत विजयी झाल्यावर या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, नाहीतर गय केली जाणार नाही. अनेक बंडखोरांशी आपल्याच लोकांनी मैत्री जपली, त्याचा फटका सर्वाधिक संगमेश्वरमध्ये बसला आहे. यापुढे पक्षाशी दगाफटका करण्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराच शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला शहरातील जवेश मंगल पार्क येथे शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडीक, कदम, विलास चाळके, बाबू महाप, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य विजयी झाले आहेत. राज्यात ९४ टक्के स्ट्राईक रेट रत्नागिरीचा आहे. काही आपल्याच पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांशी मैत्री जपली, नाहीतर हा स्ट्राईकरेट शंभर टक्केवर नक्कीच गेला असता असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी भविष्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सोबतच्या खुर्चीत बसवावे. नाहीतर पदाधिकारी एका बाजूला आणि विरोधक शेजारील खुर्चीत दिसून येतील, असा टोलाही लगावला. आपण, भैय्या आणि योगेश कदम यांनी मोठ्या प्रमाणात निधी मतदार संघात आणला; मात्र काही पदाधिकारी हा निधी आपणच आणला, असे मतदारांसमोर सांगत असल्याचेही प्रचारादरम्यान ग्रामस्थांसोबतच्या भेटीत दिसून आले. आपण जे लोकप्रतिनिधी झालो आहोत ते शिवसेनेमुळे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. यापुढे संघटना म्हणून निर्णय घेतले जातील.
गटनेते आणि प्रतोदपदांची नियुक्ती – जिल्हा परिषद गटनेतेपदी विलास चाळके, प्रतोदपदी महेश उर्फ बाबू म्हाप. पंचायत समिती गटनेते व पक्षप्रतोद असे खेड- सुनील मोरे, दापोली- नीलेश शेठ, मंडणगड अनिल रहाटे व दीपक मालुसरे, लांजा- उमेश पत्की, राजापूर- उमेश पराडकर व प्रसाद मोहरकर, संगमेश्वर – सुहास मायंगडे व सुरेश माईण, गुहागर- गौरव वेल्हाळ व प्रणव पोळेकर, चिपळूण – विनोद झगडे व बापू आयरे, रत्नागिरी – अर्चना साळवी व तारक मयेकर

