राजापूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर येथे शनिवारी सायंकाळी एक अत्यंत खळबळजनक आणि संशयास्पद घटना उघडकीस आली आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीररी्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव महिंद्रा पिकअप टेम्पोने राजापूर येथील सीएनजी पंपासमोर उभ्या असलेल्या तब्बल तीन वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातानंतर जे घडले त्याने संपूर्ण राजापूर तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे.
पोलिसांच्या उपस्थितीतच गेम प्लॅन; गाडी थेट गायब! अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रीतसर पंचनामा केला. मात्र, पंचनामा संपताच एक अजब प्रकार घडला. अपघातग्रस्त पिकअप टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देऊन पोलीस ठाण्यात नेणे अपेक्षित असताना, तस्करांनी पोलिसांच्या डोळ्यादेखत तो टेम्पो एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढत तिथून लांबवला. हा टेम्पो पोलीस ठाण्याऐवजी थेट कोदवली येथील ‘साहेबाच्या धरण’ रस्त्याकडील निर्जन भागाकडे नेण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीतच तस्करांनी एवढी मोठी हिंमत कशी केली? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उपसभापतींच्या तत्परतेमुळे तस्करांचा डाव फसला कोदवली धरणाच्या निर्जन रस्त्यावर टेम्पो नेल्यानंतर तस्करांनी आपला पुढचा प्लॅन सुरू केला. टेम्पोमध्ये लपवून ठेवलेला बेकायदेशीर दारूचा मोठा साठा दुसऱ्या एका गोव्याहून आलेल्या इनोव्हा कारमध्ये घाईघाईने भरण्याचे काम सुरू झाले. मात्र, या परिसरातील संशयास्पद हालचाली राजापूरचे उपसभापती अभिजीत गुरव यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्यांनी वेळ न गमावता थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. उपसभापतींच्या या सतर्कतेमुळे पोलिसांची चक्रे वेगाने फिरली आणि तस्करांचा दारूची विल्हेवाट लावण्याचा डाव ऐनवेळी फसला.
३.४६ लाखांचा मुद्देमाल आणि वाहने जप्त माहिती मिळताच पोलिसांनी कोदवली धरण परिसरात छापा टाकला. तिथे त्यांना अपघातग्रस्त टेम्पो आणि गोवा पासिंगची इनोव्हा कार संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी या वाहनांची सखोल झडती घेतली असता, त्यात तब्बल ३ लाख ४६ हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गोवा बनावटीचा दारूसाठा सापडला. पोलिसांनी दारूच्या साठ्यासह दोन्ही वाहने जप्त केली आहेत.
सखोल चौकशीची मागणी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले की, “अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते आणि सुरुवातीला कोणाची तक्रार नसल्याने अपघाताचा गुन्हा नोंदवला गेला नव्हता. परंतु उपसभापती अभिजीत गुरव यांनी दिलेल्या माहितीनंतर आम्ही तातडीने कारवाई करत ३.४६ लाखांची दारू आणि वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी तीन संशयितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.”
दरम्यान, पोलीस घटनास्थळी असतानाही तस्करांनी अपघातग्रस्त वाहन तिथून कसे काय हलवले? यात कोणाचे लागेबंधे आहेत का? याची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी आता राजापूरकरांमधून केली जात आहे.

