रत्नागिरी: एक छोटीशी ठिणगी आणि काही मिनिटांत सर्व काही संपलं! रत्नागिरी शहरातील आंबेशेत परिसरात आज सकाळी एका बंद घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे घरातील सर्व वस्तू कोळसा झाल्या असून, पीडित घाणेकर कुटुंब एका झटक्यात उघड्यावर आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं? ही हृदयद्रावक घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आंबेशेत येथील स्थानिक रहिवासी संजय देवजी घाणेकर यांचे घर सकाळी बंद होते. याच दरम्यान अचानक घराच्या आतून धूर आणि आगीच्या भयानक ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. घराला आग लागल्याचे पाहताच आजूबाजूच्या नागरिकांची एकच पळापळ झाली. घातपात की अपघाताची शंका असतानाच, ही आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
प्रशासनाची धाव आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये ही घटना घडल्याचे समजताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. यात नगरसेविका श्रद्धा हळदणकर, नगरसेवक गणेश भारती आणि सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर यांनी तात्काळ परिस्थिती हाताळत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या धैर्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचा जोर इतका प्रचंड होता की, जवानांना यश येईपर्यंत घरातील मौल्यवान फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि कष्टाने साठवून ठेवलेली रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
घाणेकर कुटुंबाला मदतीचा हात या भीषण दुर्घटनेत घाणेकर कुटुंबाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. राहते घर आणि डोक्यावरचे छत हिरावले गेल्याने हे कुटुंब प्रचंड धक्क्यात आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर यांनी पुढे येत पीडित कुटुंबाला तातडीची १०,००० रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही घाणेकर कुटुंबाला धीर देत जमेल तशी मदत करण्यास सुरुवात केली आहे.
तातडीने पंचनामा करून मदतीची मागणी काही तासांतच संपूर्ण संसार डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने आता या कुटुंबाकडे काहीही उरलेले नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पंचनामा करावा आणि घाणेकर कुटुंबाला लवकरात लवकर मोठी आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी आता आंबेशेत येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

