रत्नागिरी: रत्नागिरीतील झाडगाव उद्यमनगर (MIDC) परिसरात अखेर प्रशासनाचा हातोडा चालला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली आणि प्रलंबित राहिलेली अतिक्रमण विरोधी मोहीम अत्यंत कडकपणे राबवण्यात आली. या धडक कारवाईत परिसरातील सुमारे २६ बेकायदेशीर बांधकामे आणि टपऱ्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
मुंबईहून आदेश येताच स्थानिक प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये! खरं तर ही कारवाई आधीच होणे अपेक्षित होते, मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि संथ कारभारामुळे ही मोहीम रखडली होती. त्यातच मध्यंतरी ‘बकरी ईद’ सणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. स्थानिक पातळीवर टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच थेट मुंबईच्या मुख्य कार्यालयातून या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करण्याचे कडक आदेश सुटले. वरिष्ठ पातळीवरून थेट आदेश आल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली.
काही रहिवाशांना तात्पुरता दिलासा, पावसाळ्यानंतर होणार कारवाई या मोहिमेदरम्यान स्थानिक बेघर रहिवाशांच्या घरांवरही हातोडा पडणार होता; मात्र मान्सून तोंडावर आल्यामुळे आणि मानवी दृष्टिकोनाचा विचार करून प्रशासनाने येथील गरिबांना तात्पुरता दिलासा दिला आहे. सध्या पावसाळा संपेपर्यंत रहिवासी घरांवरील कारवाई थांबवण्यात आली असून, पावसाळ्यानंतर ही मोहीम पुन्हा हाती घेतली जाईल.
झोपडपट्टी निर्मूलन योजनेतून मिळणार हक्काची घरे! या कारवाईमुळे विस्थापित होणाऱ्या किंवा बेघर होणाऱ्या गरिबांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. शासन राबवत असलेल्या ‘झोपडपट्टी निर्मूलन योजने’च्या माध्यमातून या पात्र कुटुंबांना हक्काची आणि पक्की घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे अतिक्रमणे हटवली जात असली, तरी बेघरांना कायमस्वरूपी निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आता ‘मिरजोळे एमआयडीसी’ रडारवर! झाडगाव उद्यमनगरमधील ही धडक कारवाई संपताच एमआयडीसी प्रशासनाने आपला मोर्चा आता दुसऱ्या मोठ्या परिसराकडे वळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत ‘मिरजोळे एमआयडीसी’ परिसरातील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणांवरही अशीच मोठी कारवाई केली जाणार आहे. यामुळे बेकायदेशीरपणे जागा बळकावणाऱ्या भूमाफियांचे आणि टपरीधारकांचे धाबे दणाणले आहेत.

