रत्नागिरी: रत्नागिरीकरांच्या दैनंदिन जीवनाशी आणि सुरक्षेशी निगडित असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरून मंगळवारी झालेली रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत स्थानिक नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित प्रश्न आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार तोंडसुख घेतले. मात्र, केवळ चर्चा न करता या सभेत नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
🔴 शाळा-कॉलेज परिसरातील ‘ते’ मृत्यूचे सापळे तातडीने हटवणार!
शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सध्या उभे असलेले अवाढव्य जाहिरात फलक (होर्डिंग्स) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक बनले आहेत. वादळ-वाऱ्यात हे होर्डिंग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती लोकप्रतिनिधींनी आक्रमकपणे व्यक्त केली. या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी शाळा-कॉलेज परिसरातील सर्व धोकादायक होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे लेखी आदेश प्रशासनाला दिले आहेत.
🏗️ फगरवठार भिंत दुर्घटना: दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे फगरवठार येथील पालिकेच्या रस्त्याशेजारील संरक्षक भिंत कोसळली होती. यावर सभेत मोठी खडाजंगी झाली. तपासात असे समोर आले की, संबंधित ठेकेदाराने भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या खाजगी जागेत खोदकाम करताना पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. या निष्काळजीपणामुळेच दुर्घटना घडल्याने प्रशासनाने त्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच, कोसळलेली भिंत ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने पुन्हा बांधून द्यावी, असा आक्रमक पवित्रा नगरसेवकांनी घेतला.
😠 स्वस्तिक हॉस्पिटलसमोरील अतिक्रमणावरून नगरसेवक केतन शेट्ये संतापले
राम नाका परिसरातील स्वस्तिक हॉस्पिटलजवळ सुरू असलेल्या एका खाजगी बांधकामाचा मुद्दा नगरसेवक केतन शेट्ये यांनी समोर आणला. विकासकाने चक्क पालिकेच्या मुख्य गटारीवर आणि रस्त्यावर ५ ते ६ फूट पुढे येऊन पत्र्याचे फेन्सिंग ठोकले आहे, शिवाय रस्त्यावर चिरे टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. १८ मार्च रोजी लेखी तक्रार देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल करत शेट्ये यांनी हा रस्ता तातडीने मोकळा करण्याची मागणी केली.
🧹 भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांचा विशेष सर्व्हे; स्वच्छतेचे कडक नियम
शहरातील बाजारपेठांमध्ये शिस्त आणण्यासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे. शहरातील सर्व भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांकडे अधिकृत परवाने (लायसन्स) आहेत की नाही, याचा शोध घेण्यासाठी विशेष सर्व्हे केला जाईल. जे विक्रेते परिसरात घाण करतील, त्यांना थेट कडक नोटीस बजावण्यात येणार आहे. बाजार फी वसुलीचा मक्ता (ठेका) देतानाच विक्रेत्यांकडून ८ महिन्यांची रक्कम आगाऊ घेतली जाईल आणि त्यांच्यावरच परिसर स्वच्छ ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी सोपवली जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
🔌 स्ट्रीट लाईट पोलवरील अनधिकृत केबल्सचा जळमट साफ होणार
केबल टीव्ही, इंटरनेट आणि डिश टीव्ही कंपन्यांनी पालिकेच्या परवानगीशिवाय स्ट्रीट लाईटच्या खांबांवर अनधिकृत वायर्सचे जाळे पसरवले आहे. या कंपन्या पालिकेला कोणताही कर न देता शहरात उजळ माथ्याने व्यवसाय करत असल्याचा मुद्दा नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी मांडला. या कंपन्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, या पोलवर लटकणारे बेकायदेशीर जाहिरात फलकही त्वरित हटवण्याचे आदेश नगरसेवक निमेश नायर यांच्या मागणीनंतर देण्यात आले.
⛲ ऐतिहासिक विहिरींची स्वच्छता अन् उघड्या विहिरींना संरक्षक कठडे
शहरातील ऐतिहासिक मालको विहीर आणि इतर दुर्लक्षित तलावांची स्वच्छता करून तिथे सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याच्या नगरसेंविका वैभवी खेडेकर यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय, विविध प्रभागांतील उघड्या विहिरींमध्ये उनाड जनावरे पडण्याच्या घटना घडत असल्याने, खाजगी विहीर मालकांना आपापल्या विहिरींभोवती सुरक्षित भिंत किंवा कठडे बांधण्याच्या सूचना देण्याचे या सभेत निश्चित झाले.
🤝 “सर्व प्रभागांना समान न्याय द्या!” – लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी
आपल्या प्रभागात विकासकामे सुरू असताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता थेट कामांचे नारळ फोडले जात असल्याची जाहीर नाराजी नगरसेविका वर्षा ढेकणे आणि अमित पिलणकर यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे, केतन शेट्ये आणि अमित पिलणकर यांनी काही प्रभागांतील कामांना प्रशासन जाणूनबुजून डावलत असल्याचा आरोप केला. पालिकेने राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नगरसेवकांना आणि प्रभागांना समान न्याय दिला पाहिजे, या मागणीवर सर्व लोकप्रतिनिधी ठाम राहिले.

