HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यात जूनअखेर पावसाची ३१% तूट; बळीराजा चिंतेत, तालुकानिहाय आकडेवारी पहा!

रत्नागिरी जिल्ह्यात जूनअखेर पावसाची ३१% तूट; बळीराजा चिंतेत, तालुकानिहाय आकडेवारी पहा!

कोकणात भातशेतीची कामे रखडली; हवामान विभागाकडून पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

रत्नागिरी: यंदाच्या पावसाळ्यात कोकणात वरुणराजा धुवांधार बॅटिंग करेल, अशी मोठी आशा रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला आणि विशेषतः बळीराजाला होती. मात्र, जून महिना उलटला तरी पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. महसूल विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात जूनअखेर पावसाची तब्बल ३१ टक्के मोठी तूट नोंदवली गेली आहे. ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरींचा खेळ सुरू असला, तरी आकडेवारी मात्र चिंताजनक चित्र दर्शवत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा चित्र व्यस्त गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ च्या जून महिन्यात पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले होते. गेल्या वर्षी १ जून ते २ जुलै या काळात जिल्ह्यात तब्बल ९८२.२३ मिमी पावसाची नोंद झाली होती. या उलट, यंदा याच काळात अवघा ६७७.४७ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटीच पावसाने अशी काही हजेरी लावली होती की, महिन्याचा पाऊस अवघ्या ८ दिवसांत झाला होता. यंदा मात्र मान्सून वेळेवर आला नाही आणि आल्यावरही जूनमध्ये पावसाने मोठी दडी मारली. यामुळे सुरुवातीला जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊन तब्बल १८ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. जूनच्या उत्तरार्धात पावसाने थोडी हजेरी लावून तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पुरेसा ठरलेला नाही.

भातशेती रखडली, बळीराजा आभाळाकडे डोळे लावून कोकणचा मुख्य हंगाम असलेल्या खरीप शेतीवर या पावसाच्या दडीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरण्या केल्या, ते आता पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

तालुकानिहाय पावसाची सद्यस्थिती (मिमी मध्ये): जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा विचार केला तर गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा थोडा चांगला पाऊस झाला आहे, मात्र खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे.

  • मंडणगड: यंदा ६९८.२५ मिमी (गतवर्षी १०१६.५५ मिमी)

  • दापोली: यंदा ६९३.७८ मिमी (गतवर्षी ९७२.७२ मिमी)

  • खेड: यंदा ५८६.५४ मिमी (गतवर्षी ११४८.४६ मिमी)

  • गुहागर: यंदा ८२९.८० मिमी (गतवर्षी ७७१.४० मिमी)

  • चिपळूण: यंदा ५११.५७ मिमी (गतवर्षी ९३३.६५ मिमी)

  • संगमेश्वर: यंदा ५८७.९३ मिमी (गतवर्षी ११०४.६ मिमी)

  • रत्नागिरी: यंदा ८९०.७१ मिमी (गतवर्षी ८०७.७३ मिमी)

  • लांजा: यंदा ६२२.२० मिमी (गतवर्षी ११३८.४० मिमी)

  • राजापूर: यंदा ६७६.४७ मिमी (गतवर्षी ९४७.७ मिमी)

पुढील ५ दिवस महत्त्वाचे; ‘ऑरेंज अलर्ट’ने वाढवली आशा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याची सुरुवात आशेचा किरण घेऊन आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १ ते ५ जुलै दरम्यान संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर हा पाऊस अपेक्षेप्रमाणे पडला, तर जून महिन्यातील पावसाचा बॅकलॉग (तूट) भरून निघेल आणि रखडलेल्या भातशेतीच्या कामांना वेग येईल, अशी आशा आता सर्वांना लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular