रत्नागिरी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक आणि तितकाच नयनरम्य ‘आंबा घाट’ सध्या पावसाच्या रौद्र रूपाचा सामना करत आहे. शुक्रवारी (३ जुलै २०२६) सकाळी नेहमीप्रमाणे या घाटातून वाहनांची वर्दळ सुरू होती. अशातच सकाळी ९ ते ९:३० च्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर, दक्खन ते कळकदारा दरम्यान अचानक एक मोठा गडगडाट झाला. घाटातील डोंगराचा एक भलामोठा भाग थेट खाली आला आणि एकाच खळबळ उडाली. अजस्त्र दरड कोसळल्याने क्षणात या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला.
लोखंडी कठडा ठरला ‘देवदूत’! डोंगरावरून कोसळलेले हे भलेमोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या गाड्यांवरच पडणार होता. पण, महामार्गाच्या मधोमध बसवलेले लोखंडी संरक्षक कठडे (क्रॅश बॅरियर) यावेळी प्रवाशांसाठी जणू ‘देवदूत’ ठरले. या कठड्यांनी वरून आलेले अजस्त्र दगड अत्यंत भक्कमपणे अडवून धरले. त्यामुळे एक मोठा आणि भीषण अपघात अगदी थोडक्यात टळला. गाड्यांचे आणि प्रवाशांचे मोठे नुकसान होण्यापासून बचावले असले, तरी कोसळलेल्या दगडांचे बारीक तुकडे मुख्य रस्त्यावर विखुरले गेले आहेत. घाटातील वळणावर वेगाने जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हे विखुरलेले तुकडे सध्या मोठे आव्हान ठरत आहेत.
एकेरी वाहतूक बंद; मुसळधार पावसामुळे धोका वाढला गेल्या काही दिवसांपासून आंबा घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचे कडे भुसभुशीत आणि कमकुवत झाले आहेत. यामुळे भूस्खलनाचा (Landslide) धोका कमालीचा वाढला आहे. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील एकेरी वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
युद्धपातळीवर काम सुरू, चालकांनो काळजी घ्या! घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर आलेले दगड आणि माती हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सध्या या संपूर्ण परिसरावर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
घाटातून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, वळणावर विशेष दक्षता घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर पाहता गरज नसेल तर घाटातील प्रवास टाळणेच सध्या सोयीचे ठरेल.

